तिसऱया व शेवटच्या कसोटीत 9 गडी राखून विजयी, मालिकेत 2-1 फरकाने सरशी
ओव्हल / वृत्तसंस्था
यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात विजयाची औपचारिकता पूर्ण केली आणि ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. खेळाच्या पाचव्या दिवशी शेवटच्या डावात 130 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला आणखी केवळ 33 धावांची आवश्यकता होती. हे जुजबी आव्हान त्यांनी पहिल्या 64 चेंडूत पार केले. ओव्हलवरील ही कसोटी यामुळे 1912 नंतरची सर्वात छोटी ठरली.
वास्तविक, या कसोटी सामन्यात फक्त शेवटच्या 3 दिवसांचा खेळ होऊ शकला. पण, तरीही ही लढत निकाली झाली, ते आश्चर्याचे ठरले. या कसोटीतील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला तर त्यानंतर दुसऱया दिवशी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे दुसऱया दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. मात्र, उर्वरित 3 दिवसांच्या खेळात दोन्ही संघांचे डाव गडगडत राहिले आणि अंतिमतः ही लो स्कोअरिंग लढत इंग्लंडने जिंकली.
या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 118 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर सर्वबाद 158 धावांसह 40 धावांची आघाडी घेतली. नंतर द. आफ्रिकेचा दुसरा डाव 169 धावांवर आटोपला आणि इंग्लंडने 130 धावांचे टार्गेट 22.3 षटकात पार केले. झॅक क्राऊलीने 57 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 69 धावा फटकावल्या आणि या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ऑलि रॉबिन्सनला सामनावीर तर बेन स्टोक्स व कॅगिसो रबाडा यांना संयुक्त मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः सर्वबाद 118.
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 158
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव ः सर्वबाद 169
इंग्लंड दुसरा डाव (टार्गेट 130) ः झॅक क्राऊली 57 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 69, ऑलि पोप 10 चेंडूत नाबाद 11, ऍलेक्स लीस 73 चेंडूत 4 चौकारांसह 39. अवांतर 11. रबाडा 11 षटकात 57 धावात 1 बळी.