दुसऱया लढतीत न्यूझीलंडविरुद्ध 5 गडी राखून बाजी, जॉनी बेअरस्टोचे धुवांधार शतक
वृत्तसंस्था/ नॉटिंगहम
जॉनी बेअरस्टोच्या (92 चेंडूत 136 धावा) धडाकेबाज शतकाच्या बळावर यजमान इंग्लंडने येथील ट्रेंट ब्रिज कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 5 गडी राखून अक्षरशः धुव्वा उडवला. विजयासाठी 299 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 50 षटकात 5 बाद 299 धावांसह विजय खेचून आणला.
ट्रेंट ब्रिजची खेळपट्टी पाचव्या दिवशी देखील फलंदाजीसाठी उत्तम असल्याने याचा लाभ घेत षटकामागे 4.21 सरासरीने धावा जमवणे शक्य होते आणि इंग्लंडने त्या दृष्टीने आगेकूच सुरु केली. इंग्लंडचे पहिले 4 फलंदाज स्वस्तात बाद झाले असले तरी बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी जिगरबाज फलंदाजी साकारली होती.
त्यापूर्वी, इंग्लंडने न्यूझीलंडचा दुसरा डाव 284 धावांवर गुंडाळला आणि यानंतर चौथ्या डावात त्यांच्यासमोर 299 धावांचे टार्गेट होते. उपाहाराला 45 मिनिटांचा खेळ बाकी असताना न्यूझीलंडचा दुसरा डाव खुर्दा झाला होता.
पाहुण्या संघाने 7 बाद 224 या मागील धावसंख्येवरुन पुढे सुरुवात केली. डॅरेल मिशेल 62 धावांवर नाबाद राहिला. मॅट हेन्री (18), काईल जेमिन्सन (1) यांना स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले तर ट्रेंट बोल्टला अँडरसनने तंबूचा रस्ता दाखवला.
इंग्लंडची खराब सुरुवात
काईल जेमिसन पाठदुखीमुळे गोलंदाजी करु शकला नसला तरी न्यूझीलंडतर्फे बोल्टने झॅक क्राऊलीला शून्यावर बाद करत जोरदार धक्का दिला. पहिल्या डावातील शतकवीर ऑलि पोप (18) व जो रुट (3) स्वस्तात बाद झाले. ऍलेक्स लीजने 44 धावांची लक्षवेधी खेळी साकारली. मात्र, नंतर तो टीम साऊदीच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देत बाद झाला आणि इंग्लंडची 4 बाद 93 अशी स्थिती झाली. या अडचणीच्या स्थितीतून बेअरस्टो व स्टोक्स यांनी 52 चेंडूत 46 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद 553, इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 539, न्यूझीलंड दुसरा सर्वबाद 284, इंग्लंड दुसरा डाव ः 50 षटकात 5 बाद 299 (ऍलेक्स लीज 44, जॉनी बेअरस्टो 92 चेंडूत 136, बेन स्टोक्स 70 चेंडूत नाबाद 75. ट्रेंट बोल्ट 3-94, टीम साऊदी, मॅट हेन्री प्रत्येकी 1 बळी).
रुटने गावसकरचा विक्रम मागे टाकला
इंग्लंडचा फलंदाज जो रुटने 10194 कसोटी धावा जमवत माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांचा 10122 धावांचा विक्रम मागे टाकला. रुटने ट्रेंट ब्रिज कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी या विक्रमाला गवसणी घातली. त्यावेळी इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने 176 धावांची धमाकेदार खेळी साकारली होती.
या विक्रमासह रुट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत 12 व्या स्थानी झेपावला. सध्या या यादीत भारतीय लिजेंड सचिन तेंडुलकर 15921 धावांसह अव्वलस्थानी विराजमान आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमवणारे फलंदाज
फलंदाज / सामने / धावा / सर्वोच्च / शतके / अर्धशतके
सचिन तेंडुलकर / 200 / 15921 / 248ना. / 51 / 68
रिकी पाँटिंग / 168 / 13378 / 257 / 41 / 62
जॅक कॅलिस / 166 / 13289 / 224 / 45 / 58
राहुल द्रविड / 164 / 13288 / 270 / 36 / 63
ऍलिस्टर कूक / 161 / 12472 / 294 / 33 / 57
कुमार संगकारा / 134 / 12400 / 319 / 38 / 52
ब्रायन लारा / 131 / 11953 / 400ना. / 34 / 48
एस. चंदरपॉल / 164 / 11867 / 203ना. / 30 / 66
महेला जयवर्धने / 149 / 11814 / 374 / 34 / 50
ऍलन बोर्डर / 156 / 11174 / 205 / 27 / 63
स्टीव्ह वॉ / 168 / 10927 / 200 / 32 / 50
जो रुट / 119 / 10194 / 254 / 27 / 53
सुनील गावसकर / 125 / 10122 / 236ना. / 34 / 45
युनूस खान / 118 / 10099 / 313 / 34 / 33
विद्यमान खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके
जो रुट 27
स्टीव्ह स्मिथ 27
विराट कोहली 27
केन विल्यम्सन 24
डेव्हिड वॉर्नर 24