ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी मात, सामनावीर मलानचे अर्धशतक, सॅम करणचे 3 बळी
वृत्तसंस्था/ कॅनबेरा
येथे झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाचा केवळ 8 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 49 चेंडूत 82 धावा फटकावणाऱया डेव्हिड मलानला सामनावीराचा बहुमान मिळाला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 178 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 6 बाद 170 धावांवर रोखत 8 धावांनी विजय मिळविला. विशेष योगायोग म्हणजे पर्थमध्ये झालेला पहिला सामनाही इंग्लंडने 8 धावांनीच जिंकला होता. या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना शुक्रवारी 14 ऑक्टोबर रोजी याच मैदानावर होणार आहे. प्रकाशझोतात खेळविला जाणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.40 वाजता सुरू होणार आहे.
मलान, मोईनची अर्धशतकी भागीदारी
इंग्लंडच्या डावाची चांगली सुरुवात झाली नाही. बटलर 17 धावा काढून बाद झाल्यानंतर ऍलेक्स हॅलेसला स्टोईनिसने केवळ 4 धावांवर बाद केले. बेन स्टोक्स (7) व हॅरी ब्रुक (1) हे दोघेही झटपट बाद झाल्यानंतर नवव्या षटकात इंग्लंडची स्थिती 4 बाद 54 अशी झाली. एका बाजूने चांगली फलंदाजी करणाऱया डेव्हिड मलानला अष्टपैलू मोईन अलीकडून चांगली साथ मिळाली. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी 92 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली. मोईनने 27 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 44 धावा फटकावल्या.
मोईन बाद झाल्यानंतर सॅम करण धावगती वाढविण्याच्या नादात लवकर बाद झाला. सॅम करणने 6 चेंडूत 8, ख्रिस जॉर्डनने 3 चेंडूत नाबाद 7 धावा जमविल्या. मलान सातव्या गडय़ाच्या रूपात शेवटच्या षटकात बाद झाला. स्टोईनिसला उत्तुंग फटका मारताना बदली खेळाडू स्मिथने त्याचा झेल टिपला. त्याने 49 चेंडूंच्या खेळीत 7 चौकार, 4 षटकार मारले. ऑस्ट्रेलियातर्फे स्टोईनिस सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 34 धावांत 3 बळी मिळविले तर ऍडम झाम्पाने 2, स्टार्क व कमिन्स यांनी एकेक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाचीही खराब सुरुवात
179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 6 बाद 170 धावांपर्यंतच मजल मारता आली. चौथ्या षटकात कर्णधार ऍरोन फिंच 13 धावा काढून बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात वॉर्नरही 4 धावांवर बाद झाला. आणखी 29 धावांची भर पडल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही (8) स्वस्तात बाद झाला. मिशेल मार्श एका बाजूने फटकेबाजी करीत होता. त्याला अष्टपैलू स्टोईनिकडून थोडीफार साथ मिळाली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी 23 चेंडूत 40 धावांची भागीदारी केली. बाराव्या षटकात स्टोईनिसला करणने बाद केले. त्याने 13 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 22 धावा फटकावल्या.
मार्श चांगली फलंदाजी करत होता. पण अर्धशतकासमीप आला असताना तो पाचव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. मार्शने 29 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 45 धावा काढल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 14.1 षटकांत 114 धावांत तंबूत परतला होता. टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड व कमिन्स यांनी उर्वरित षटकांत फटकेबाजी करून उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला. पण इंग्लंडच्या अचूक माऱयापुढे त्यांना त्यापासून दूर रहावे लागले. टिम डेव्हिडने आक्रमक खेळत 23 चेंडूत 5 चौकार, एका षटकाराच्या मदतीने 40 धावा तडकावल्या. सॅम करणने त्याचा त्रिफळा उडवून इंग्लंडसमोरील मोठा अडथळा दूर केला. शेवटच्या 16 चेंडूत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 34 धावांची गरज होती. पण वेड व कमिन्स यांना त्यापैकी 25 धावाच जमविता आल्याने त्यांना केवळ 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडच्या सॅम करणने किफायतशीर मारा करीत 25 धावांत 3 बळी मिळविले तर बेन स्टोक्स, डेव्हिड विली, रीस टॉपली यांनी एकेक बळी मिळवित त्याला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 20 षटकांत 7 बाद 178 ः बटलर 13 चेंडूत 17, हॅलेस 4, मलान 82 (49 चेंडूत 7 चौकार, 4 षटकार), स्टोक्स 11 चेंडूत 7, ब्रूक 1, मोईन अली 44 (27 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), सॅम करण 8, जॉर्डन नाबाद 7, अवांतर 8. गोलंदाजी ः स्टोईनिस 3-34, ऍडम झाम्पा 2-26, कमिन्स 1-29, स्टार्क 1-42.
ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 6 बाद 170 ः वॉर्नर 2, फिंच 13, मार्श 45 (29 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), मॅक्सवेल 8, स्टोईनिस 22 (13 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), टिम डेव्हिड 40 (23 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), वेड नाबाद 10, कमिन्स नाबाद 18 (11 चेंडूत 1 षटकार), अवांतर 10. गोलंदाजी ः सॅम करण 3-25, स्टोक्स 1-10, विली 1-21, टॉपली 1-35.