सामनावीर डेव्हिड मलानचे शानदार शतक, बांगलादेशचा तीन गड्यांनी पराभव
वृत्तसंस्था /मीरपूर
इंग्लंडचा क्रिकेट संघ न्यूझीलंडचा दौरा संपवून बांगलादेशमध्ये वनडे मालिका खेळण्यासाठी दाखल झाला. इंग्लंड आणि यजमान बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ‘सामनावीर’ डेव्हिड मलानच्या शानदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने बांगलादेशचा 3 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान बांगलादेशचा डाव 47.2 षटकात 209 धावात आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 48.4 षटकात 7 बाद 212 धावा जमवत हा सामना जिंकला. बांगलादेशच्या डावामध्ये नजमुल हुसेन शांतोने 82 चेंडूत 6 चौकारासह 58, मेहमुदुल्लाने 48 चेंडूत 3 चौकारासह 31, कर्णधार तमीम इक्बालने 32 चेंडूत 4 चौकारासह 23, मुशफिकर रहिमने 1 षटकारासह 16, तस्कीन अहमदने 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 तर तैजुल इस्लामने 1 चौकारासह 10 धावा जमवल्या. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे आर्चर, मार्क वूड, मोईन अली, आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन तर वोक्स आणि
जॅक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सलामीचा लिटॉन दास केवळ 7 धावावर बाद झाला. मेहमुदुल्ला आणि नजमुल हुसेन शांतो यांनी पाचव्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. मोईन अली, आदिल रशीद यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचे तळाचे फलंदाज लवकर बाद झाले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या डेव्हिड मलानने फिरकीला साथ देणाऱ्या मीरपूरच्या खेळपट्टीवर चिवट फलंदाजी करत नाबाद शतक झळकवले. त्याने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 145 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारासह नाबाद 114 धावा जमवल्या. मात्र इंग्लंडच्या डावामध्ये बांगलादेशच्या शकीब अल हसनने पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रॉयला 4 धावावर झेलबाद केले. त्यानंतर ताजुल इस्लामने
सॉल्टचा त्रिफळा उडवला. त्याने 1 चौकारासह 12 धावा केल्या. ताजुल इस्लामने व्हिन्सला यष्टीरक्षक रहिमकरवी यष्टिचित केले. त्याने 1 चौकारासह 6 धावा जमवल्या. तस्कीन अहमदने कर्णधार बटलरला नजमुल हुसेनकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 1 चौकारासह 9 धावा जमवल्या. इंग्लंडची स्थिती यावेळी 16.1 षटकात 4 बाद 65 अशी होती. मेहदी हसन मिराजने जॅक्सचा बळी मिळवला. त्याने 31 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 26 धावा जमवताना मलानसमवेत पाचव्या गड्यासाठी 38 धावांची भर घातली. मोईन अली मेहदी हसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 32 चेंडूत 1 चौकारासह 14 धावा जमवल्या.
तैजुल इस्लामने वोक्सला 7 धावावर झेलबाद केले. 38.5 षटकात इंग्लंडने 7 बाद 161 धावा जमवल्या होत्या. डेव्हिड मलान आणि आदिल रशीद यांनी बांगलादेशच्या फिरकीसमोर सावध फलंदाजी करत आपल्या संघाला 8 चेंडू बाकी ठेऊन तीन गड्यांनी विजय मिळवून दिली. रशीदने 29 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 17 धावा जमवताना मलानसमवेत आठव्या गड्यासाठी अभेद्य 51 धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या डावात 5 षटकार आणि 18 चौकार नोंदवले गेले. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लामने 3, मेहदी हसन मिराजने 2 तर शकीब अल हसन व तस्कीन अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आता या मालिकेतील दुसरा सामना पुन्हा मीरपूरमध्ये शुक्रवारी खेळवला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 47.2 षटकात सर्वबाद 209 (तमीम इक्बाल 23, नजमुल हुसेन शांतो 58, मुशफिकर रहीम 16, मेहमुदुल्ला 31, तस्कीन अहमद 14, तैजुल इस्लाम 10, आर्चर 2-37, वुड 2-34, मोईन अली 2-35, आदिल रशीद 2-47, वोक्स 1-28, जॅक्स 1-18), इंग्लंड 48.4 षटकात 7 बाद 212 (डेव्हिड मलान नाबाद 114, आदिल रशीद नाबाद 17, सॉल्ट 12, विन्से 6, बटलर 9, जॅक्स 26, मोईन अली 14, ताजुल इस्लाम 3-54, मेहदी हसन मिराज 2-35, शकीब अल हसन 1-45, तस्कीन अहमद 1-26).