सलग 13 तास प्रवास : महादेव पाटील यांचा उपक्रम
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
‘सावळय़ा विठुरायाच्या दर्शनाची आस,मनी धरुनी सायकल चाले पंढरीची वाट’
विठुरायाच्या दर्शनाची आस मनाशी बाळगून गौंडवाड गावचे विठ्ठलभक्त महादेव गंगाराम पाटील (वय 68) पंढरपूरला कार्तिक एकादशी यात्रेला सायकलवरुन जाऊन परत पंढरपूर ते गौंडवाड 13 तासांचा प्रवास करुन गौंडवाड गाठले. तरुणांना लाजवेल असा विक्रम केल्यामुळे गौंडवाड किर्यात भागामध्ये या विठ्ठल भक्ताचे कौतुक करण्यात येत आहे.
महादेव पाटील हे माळकरी नाहीत. परंतु विठुरायाच्या दर्शनासाठी ते सायकलवरुन जाणे पसंद करतात. पंढरपूरला सायकलवरुत जात असताना त्यांची पद्धत पाहून अनेक नागरिक त्यांना प्रेरणा देत होते असे त्यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले. महादेव पाटील एक अनोखे विठ्ठलभक्त आहेत. ते एक उत्तम सायकलपटू आहेत. उमेदीच्या काळामध्ये त्यांनी अनेक सायकल शर्यती गाजविल्याचेही महादेव पाटील यांनी यावेळी आवर्जून
सांगितले.
अखंड 13 तास सायकल प्रवास
1985 ते 2018 सालापर्यंत त्यांनी सायकलवरुन पंढरपूर आषाढी यात्रा, कार्तिकी यात्रा, माघ यात्रा अशा यात्रांना गेल्याचे सांगितले.
1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करून रात्री 10 वाजता ते पंढरपूरला पोहोचले. विठुरायाचे दर्शन घेऊन दोन दिवसाच्या मुक्कामानंतर 5 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता पंढरपूरहून गौंडवाडकडे प्रस्थान केले. रात्री 10 वाजता गौंडवाडला पोहोचले. प्रवासादरम्यान एक तास विश्रांती वगळता अखंड 13 तास सायकल प्रवास केला असेही त्यांनी सांगितले.
सायकल चालवा, तंदरुस्त रहा -महादेव पाटील (सायकलपटू)
निरोगी शरीरयष्टीची पोचपावती म्हणून मी सायकलवरुन पंढरपूर-गौंडवाड हा 13 तासाचा प्रवास केला. आजच्या तरुणांनी विविध व्यसनांच्या आहारी न जाता आपली शरीरयष्टी तंदरुस्त, रोगमुक्त करण्यासाठी व्यसनापासून दूर राहून दररोज सायकल मारणे, व्यायाम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. आजच्या तरुण पिढीने याचे अवलोकन करावे, असाही संदेश त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिला.