अध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून प्रस्ताव : भारतातील राजदूतपद दोन वर्षांपासून रिक्त
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेच्या लॉस एंजिलिस शहराचे माजी महापौर एरिक गार्सेटी हे भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत होऊ शकतात. अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या फॉरेन रिलेशन कमिटीने भारतातील राजदूत म्हणून गार्सेटी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. यासंबंधी आता सिनेटमध्ये मतदान होणार आहे, त्यानंतरच गार्सेटी हे भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त होतील. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी गार्सेटी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. फॉरेन रिलेशन कमिटीच्या 13 सदस्यांनी गार्सेटींच्या बाजूने मतदान केले आहे. यात रिपब्लिकन पार्टीचे दोन खासदार टोड यंग आणि बिल हॅगर्टी यांचा समावेश आहे. भारतात स्थायी राजदूत नियुक्त करणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे या कमिटीने म्हटले आहे.
सिनेटच्या विदेश संबंध समितीने एकमताने गार्सेटी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. गार्सेटी यांच्या नियुक्तीवर आता लवकरच शिक्कामोर्तब होऊ शकते. गार्सेटी हे जो बिडेन यांचे निकटवर्तीय असून त्यांना हिंदी आणि उर्दू भाषा अवगत आहे. विदेश संबंध समितीतील 8 सदस्यांनी गार्सेटी यांच्या विरोधात मतदान केले आहे. मागील वर्षी देखील गार्सेटी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु लॉस एंजिलिसचे महापौर असताना लैंगिक शोषण करणाऱया स्वतःच्या सहकाऱयावर कारवाई न करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याचमुळे त्यांना राजदूतपदी नियुक्त करण्यात आले नव्हते. गार्सेटी यांचे चीफ ऑफ स्टाफ रिक जेकब्सने लॉस एंजिलिसच्या पोलीस अधिकाऱयाचे लैंगिक शोषण केले होते. याची कल्पना असूनही गार्सेटी यांनी जेकब्स विरोधात कारवाई केली नसल्याचे मे 2022 मध्ये सिनेटमध्ये सादर अहवालात म्हटले गेले होते.
भारतात नव्हता राजदूत
भारतात 2 वर्षांपासून अमेरिकेचा स्थायी राजदूत नाही. भारतासारख्या महत्त्वाच्या देशात स्थायी राजदूत नसल्याने दोन्ही देशांचे संबंध प्रभावित होऊ शकतात असे तज्ञांचे म्हणणे होते. ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेने एलिझाबेथ जोन्स यांना भारतातील दूतावासाच्या तात्पुरत्या प्रभारी म्हणून नियुक्त केले होते. अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि पाकिस्तान यासारख्या देशांमध्ये अमेरिकेचे राजदूत कार्यरत आहेत. अशा स्थितीत भारतात अमेरिकेचा राजदूत नसणे मोठी चूक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.