जिल्हाधिकाऱयांना आपचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ाला एम्स हॉस्पिटल मंजूर करण्यात आले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात हे हॉस्पिटल मंजूर झाले होते. बेळगाव शहरात किंवा परिसरात हे भव्य हॉस्पिटल उभारणीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र भाजपच्या कार्यकाळात ही प्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. यामागे षड्यंत्र असून तातडीने भाजप सरकारने बेळगावात एम्स हॉस्पिटलची स्थापना करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गोर-गरिबांना वेळेत उपचार मिळाले पाहिजेत. कोणताही गंभीर आजार झाल्यानंतर बेळगावमध्ये उपचार मिळणे कठीण झाले आहे. खासगी संस्थांनी मनमानीपणे शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही. याचबरोबर बेळगाव जिल्हय़ातील 10 हजार लोकांना त्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. तेव्हा त्याचा गांभीर्याने विचार करून बेळगावात एम्स हॉस्पिटलची उभारणी करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रकल्प हा 2 हजार कोटींचा आहे. त्याला काँग्रेस सरकारने मंजुरी दिली होती. मात्र त्यानंतर याची सर्व प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. तेव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेळगावात हे हॉस्पिटल उभे करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संजय काकतकर, ऍड. पूजा पाटील, राजू बाळेकुंद्री, सदानंद प्रभू, राजू बाळेकुंद्री यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.