पोर्तुगाल, फ्रान्समध्ये 40 अंशाहून अधिक तापमान
वृत्तसंस्था/ लंडन
युरोपच्या अनेक देशांमध्ये सध्या तापमान अधिक असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतोय. ब्रिटनमध्ये तर तापमानसंकट पाहता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांना उष्णतेपासून वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स आणि क्रोएशिया यासारख्या देशांमध्ये वणव्यांचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे तापमान अधिकच वाढत आहे. हवामान बदल या वाढत्या उष्णतेसाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
ब्रिटनमध्ये यापूर्वी 25 जुलै 2019 रोजी कॅम्ब्रिजमध्ये सर्वाधिक 38.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. परंतु पारा आता 40 अंशांवर पोहोचला आहे. गंभीर स्थिती पाहता हजारो लोकांना स्थलांतराचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बचावपथक लोकांना सुरक्षितस्थळी हटविण्याचे काम करत आहे.
युरोपचा मोठा हिस्सा सध्या उष्णतेमुळे त्रस्त आहे. जगभरातील पर्यटक युरोपमध्ये उन्हाळय़ात पोहोचत असतात परंतु यंदा उष्णता अधिक असल्याने पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. अशा स्थितीत अनेक देशांनी याला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. स्पेनमध्ये दुष्काळामुळे जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांमुळे सरासरी तापमान वाढले आहे.
फ्रान्सच्या 22 हजार एकरात फैलावलेल्या जंगलात वणवा भडकला असून परिसरातील 12 हजार लोकांना वाचविण्यात आले आहे. 3 हजारांहून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीमुळे 160 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर शेकडो लोकांना स्वतःचे घर सोडून अन्यत्र आश्रय घ्यावा लागला आहे. तेथे आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात एक विमान कोसळल्याने वैमानिकाला जीव गमवावा लागला आहे. स्पेनमध्ये मागील एक आठवडय़ात उष्मालाटेमुळे 237 जणांचा मृत्यू झाला आहे.