दिल्ली येथे होणार कार्यक्रम : विविध वाहनांचे होणार सादरीकरण
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांचे प्रदर्शन (ईव्ही एक्स्पो) भरविण्यात येणार आहे. ईव्ही एक्स्पो 2022 च्या 5 ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये हे प्रदर्शन होणार असल्याची माहिती आहे. दिल्लीमधील प्रगती मैदानावर हे एक्स्पो आयोजीत होणार आहे. यावेळी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
ईव्ही एक्स्पोची ही 15 वी आवृत्ती आहे. सदरचा कार्यक्रम प्रगती मैदानाच्या 11 नंबर हॉलमध्ये होणार आहे. यावेळी इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचा प्रवास व त्यांच्याशी संबंधीत साहित्यांसह पर्यावरणास अनुकूल राहण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन, कम्पोनंट्स व अन्य सेवांशी संबंधीत टेक्नॉलॉजीचे सादरीकरण यामध्ये पहावयास मिळणार आहे.
2015 पासून होत आहे नियोजन
अल्टीअस ऑटो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे ईव्ही एक्स्पो, इलेक्ट्रिक वाहने, ऍक्सेसरीज, बॅटरी आणि चार्जिंग सोल्युशन याच्याशी संबंधीत भारतामधील सर्वात मोठे प्रदर्शत 2015 पासून भरवले जाते. डिसेंबर 2015 ते 2017 पर्यंत याचे नियोजन नवी दिल्ली व कोलकातामध्ये केले जात होते. मात्र त्यानंतर याचे आयोजन बेंगळूर, लखनऊ आणि हैदराबाद या ठिकाणीही याचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे ईव्ही वाहनांशी संबंधीत मोठे प्रदर्शन प्रत्येक ऑगस्ट महिन्यात भरविले जाते.
ईव्हीच्या मागणीत तेजी
ईव्ही एक्स्पो 2022 चे आयोजक राजीव अरोरा यांनी यावेळी सांगितले आहे, की काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता आम्ही जीवनात इलेक्ट्रिक-मोबिलिटीची वाढती अनुकूलता अनुभवत आहोत. आपल्या देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची दिवसांगणिक मागणी वाढत आहे. यामुळे आगामी काळात ईव्ही वाहनांची निर्मिती, बॅटरी कम्पोनंट, ऍक्सेसरीज, फायनान्स, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेन्ट, सर्व्हिसेस यांना विकसित करणे, प्रोत्साहन देणे व सपोर्ट करण्याची गरज असल्याचेही अरोरा यांनी यावेळी स्पष्ट केले.