वृत्तसंस्था/ बोस्टन
येथे झालेल्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये केनियाच्या धावपटूनी आपले वर्चस्व नेहमीप्रमाणे कायम राखले पण यावेळी केनियाच्या विजेत्या धावपटूमध्ये इलुड किपचोगीचा समावेश होऊ शकला नाही.
जागतिक मॅरेथॉन क्षेत्रातील बोस्टन मॅरेथॉन ही सर्वात प्रतिष्ठेची आणि जुनी म्हणून ओळखली जाते. सोमवारी झालेल्या या मॅरेथॉनमध्ये केनियाच्या विद्यमान विजेत्या इव्हान्स चेबेटने आपल्याच देशाच्या आणि विश्वविक्रमवीर किपचोगीला मागे टाकत पुरुष विभागातील जेतेपद पटकावले. या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी चेबेटने विजेतेपद मिळवले आहे. चेबेटने ही स्पर्धा 2 तास, 5 मिनिटे आणि 54 सेकंदाचा अवधी घेत जिंकली. टांझानियाच्या गॅब्रियल गे याने दुसरे स्थान तर केनियाच्या किप्रुटोने तिसरे स्थान मिळवले. किपचोगीला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या मॅरेथॉनमध्ये महिलांच्या विभागात केनियाच्या हेलेन ओबिरीने विजेतेपद पटकावताना 2 तास 21 मिनिटे आणि 38 सेकंदाचा अवधी नोंदवला. केनियाच्या ओबिरीने यापूर्वी दोनवेळा 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पिक रौप्यपदके मिळवली आहेत. बोस्टन मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या अॅमेनी बेरिसोने दुसरे स्थान तर इस्त्रायलच्या सेलपेटरने तिसरे स्थान घेतले.