नागझर फोंडा येथील घटना; संशयित महिला एजंट बिनधास्त
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा व धारबांदोडा भागातील महिलांना गोवा सरकारच्या लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ मिळवून दिल्यानंतर (कमिशनरूपी) आपला वाटा न दिल्याच्या कारणावरून एका संशयित महिला एजंटाने लाडली लक्ष्मी लाभार्थीलाच बेदम मारहाण केल्याचा प्रकार काल सांयकाळी फोंडा पोलीस स्थानकात उघडकीस आला. याप्रकरणी त्या संशयित महिलेविरोधात फोंडा पोलीस स्थानकात काही महिलांनी तक्रार दाखल केली आहे.
प्राप्त माहितीनुसार गोवा सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या लाडली लक्ष्मीच्या अर्जदारांना हेरून संशयित महिला एजंट मदत करीत आहे. ती एका राष्ट्रीयकृत राजकीय पक्षाची सदस्यही असल्याचे सांगत असल्याची माहिती तक्रारदार महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. संशयित महिला एजंट लाडली लक्ष्मी योजनच्या अर्जदाराचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर त्यांना सांगितल्याप्रमाणे करारानुसार रोख पैसे देण्यात यावे अशी तीची अट असते. आपल्याच शेजारी राहत असलेल्या महिलेनेचे नियोजीत पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्यामुळे काही शुल्लक कारणावरून त्या लाडली लक्ष्मी लाभार्थी महिलेला तीने बेदम मारहाण केली. पिडीत महिला गंभीर जखमी झाली असून तीला उपचारासाठी फोंडा उपजिल्हा इस्पितळातून थेट मडगांव येथील हॉस्पिसिओ इस्पितळात पाचारण करण्यात आले आहे.
लाभार्थीना मारहाण निंदनीय प्रकार-तारा केरकर
युवतीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी सरकारतर्फे मदत हा या लाडली लक्ष्मी योजनेचा उद्देश आहे. मात्र अशा एंजटांमुळे अनेक लाभार्थीना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही लाभार्थीनीना या पैशामुळे माराहाण सहन करावी लागली या घटनेचा महिला स्वयंसेविका तारा केरकर यांनी तीव्र निषेध केला आहे. राज्यभर लाडली लक्ष्मीचे अर्ज मंजूर करून आपले हिस्सा घेणारे एंजट फोफावलेले आहेत. काही दुर्बल महिलांही अशा एजंटाना बळी पडत आहे. महिला एजंट बिनधास्त आपण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सांगून त्याच्याकडून मंजूरीच्या बदल्यात आपला वाटा मागण्याचा प्रकारही निंदनीय आहे. पिडीत महिलेला मारहाण केल्याची रितसर तक्रार फोंडा पोलीसांनी दाखल करून घ्यावी व याप्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी तारा केरकर यांनी केली आहे. फोंडा पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर याप्रकरणी कोणती कारवाई करतात यावर सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.