विजय सरदेसाई यांनी सभापती तवडकर यांना मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संबोधल्याने वाद, : सभापतींनी सर्व विरोधी आमदारांना नाकारली भेट प्रकरण पोहोचले राज्यपालांकडे
प्रतिनिधी /पणजी
आपणावर आक्षेपार्ह टीका टिपण्णी करणारे आमदार विजय सरदेसाई जोपर्यंत जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत कोणत्याही विरोधी आमदाराला आपण भेटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत सभापती रमेश तवडकर काल मंगळवारी विधानसभेतून निघून गेले. त्यामुळे नंतर त्यांना भेटण्यासाठी आलेल्या विरोधी आमदारांची गोची झाली. मात्र ’आपण माफी मागण्यासारखे काही बोललेलोच नाही, त्यामुळे तसा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका सरदेसाई यांनी घेतल्याने सभापती व विरोधक असा संघर्ष उफाळल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांनी नंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात तसेच विरोधक आणि सभापती यांच्यातील गोंधळ मिटवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.
सोमवारी सातही विरोधी आमदारांची पर्वरी विधानसभेत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर त्यांनी आपणास भेटण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार आपण वेळही दिली होती. परंतु तेथून बाहेर गेल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सरदेसाई यांनी आपणावर टीका केली, आपण मुख्यमंत्र्यांचा कर्मचारी असल्याप्रमाणे वागत असल्याचे वक्तव्य केले. असे वक्तव्य करणे हा सभापतीच्या आसनाचा अवमान आहे, अशा शब्दात तवडकर यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभा संकुलात काल मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कालावधी ठरविण्याचा निर्णय सरकारचा
कामकाजाचा कालावधी ठरविण्याचा निर्णय हा सरकारचा असून त्यात आपली भूमिका काहीच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर विरोधी आमदारांनी अधिवेशन कामकाज कालावधीसंबंधी मागणी आपणाकडे मांडायला हवी होती, पत्रकारांकडे नव्हे, असेही तवडकर म्हणाले.
गोव्यासाठी काळा दिवस : आलेमाव
दरम्यान, त्यानंतर लगेचच त्यांना भेटण्यासाठी आलेल्या विरोधी आमदारांना भेटण्यास नकार देत ते विधानसभेतून निघून गेले. या प्रकाराच्या काही मिनिटांतच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्या सहकाऱयांसमवेत पत्रकार परिषद घेऊन सभापतींच्या कृतीचा निषेध केला. अशाप्रकारे सभापतींनी विरोधी आमदारांना भेट नाकारणे हा गोव्यासाठी ’काळा दिवस’ असल्याचे ते म्हणाले. तसेच या प्रकरणी राज्यपालांना भेटून त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
माफी मागतो, आधी अधिवेशन कालावधी वाढवा
विजय सरदेसाई यांनी सांगितले की सभापतींनी आधी भेटण्यास वेळ दिली परंतु नंतर ते न भेटताच निघून गेले. यावरून सभापती पक्षपाती वागत असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. आपण सभापतींना सरकारी कर्मचारी म्हटले नव्हते. तर ’सरकारने सभापतींना कर्मचारी समजू नये’, असे म्हटले होते, असे सरदेसाई यांनी सांगितले. त्यामुळे माफीचा मागण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही सभापतींची इच्छाच असेल तर आपण माफीही मागण्यास तयार आहे, मात्र आधी त्यांनी अधिवेशनाचा कालावधी 15 दिवस करत असल्याचे जाहीर करावे, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले.
पहिल्यांदाच खासगी दिवस रद्द
विधानसभेच्या इतिहासात प्रथमच खाजगी सदस्य दिन अधिवेशनातून रद्द करण्यात आला असून हा निर्णय लोकशाहीत अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल, अशी टीकाही विजय सरदेसाई यांनी केली. 16 ते 19 जानेवारी या कालावधीत विधानसभेचे 4 दिवसांचे अधिवेशन होणार आहे. मात्र त्यामुळे खाजगी सदस्य दिवस वगळला जात होता. त्यामुळे अधिवेशन कालावधी आणखी एका दिवसाने वाढवावा, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. खाजगी सदस्य दिवस हा आमदारांचा घटनात्मक अधिकार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
अवमानाबद्दल आधी माफी मागा, नंतर भेटू
सभापतीं रमेश तवडकर
कालचा मंगळवार ठरला गोव्यासाठी काळा दिवस
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव
माफी मागतो, अगोदर अधिवेशन 15 दिवसांचे करा
आमदार विजय सरदेसाई
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेस संतप्त
विधानसभा अधिवेशन प्रश्नावरुन सभापतीविरुद्ध विरोधक यांच्या संघर्षात मुख्यमंत्र्यांनी ‘गोव्यातील विरोधी आमदारांचे वर्तन हाच लोकशाहीला धोका’ अशा कडक शब्दातून व्टिटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर काँग्रेसही बरीच संतापलेली दिसली.
काँग्रेसने व्टिटद्वारे त्याला तेवढय़ाच भाषेतून उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वार्थी हेतूने झुवारी पुलावर सेल्फी घेतला व केवळ प्रसिद्धीचा स्टंट केला. प्रत्यक्षात जनतेला मात्र प्रचंड वाहतुकीच्या गर्दीमुळे वाहतूक ठप्प झाल्याचा फटका बसला आहे, असे म्हटलेले आहे व मुख्यमंत्र्यांना अकार्यक्षम संबोधले आहे.