युवकांच्या टोळीकडून कोयत्याने वार ; हल्लेखोरांच्या तपासासाठी पथके रवाना
सातारा प्रतिनिधी
माजी जिल्हा परिषद सदस्य, सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत लिंब (ता. सातारा) यांच्यावर (रविवार) रात्री 10 च्या दरम्यान युवकांच्या टोळक्याने धारदार कोयत्यासारख्या शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी दुपारच्या दरम्यान त्यांना अधिक उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लिंब (शेरी) परिसरातील रस्त्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. जितेंद्र सावंत यांच्या मानेवर, चेहऱ्यावर वार झाले आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रात्रीच तत्काळ साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्यांना आता पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावात तणावपूर्ण वातावरण बनले होते. रुग्णालय परिसरात त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली होती. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरांच्या शोधासाठी पथक रवाना केली असून हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र घडलेल्या प्रकराबाबत लिंब गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.