इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त, डीसीआरबी विभागाची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
केपीटीसीएल ज्युनिअर असिस्टंट परीक्षा घोटाळाप्रकरणी धरपकड सुरूच आहे. सीसीआरबीचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱयांनी बेंगळूरच्या युवकाला अटक केली असून त्याच्याजवळून 9 लाख 85 हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 17 वर पोहोचली आहे.
मोहम्मद अजिमुद्दीन उर्फ अजिम (वय 39, रा. देवसंद्र, बेंगळूर) असे त्याचे नाव आहे. परीक्षा घोटाळय़ासाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे याच महाभागाने पुरविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून पोलिसांनी त्याच्या दुकानातून मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत.
या खळबळजनक प्रकरणाचा तपास डीसीआरबीचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर, ए. एच. बजंत्री, एस. आर. माळगी, एन. आर. फडय़ाप्पण्णावर, जी. एस. लमाणी आदींचा समावेश असलेल्या डीसीआरबी व जिल्हा सीईएनच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
स्मार्टवॉच व इतर अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून केपीटीसीएल ज्युनिअर असिस्टंट भरतीसाठीच्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणात घोटाळा करण्यात आला आहे. केवळ याच परीक्षेसाठी नव्हे तर मोहम्मद अजमुद्दीनने इतर परीक्षांसाठीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुरविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
बेंगळूर येथील एसपी रोडवर स्पाई झोन नामक दुकान चालविणाऱया मोहम्मद अजमुद्दीनजवळून ऍटोमॅटिक इलेक्ट्रीक डिक्हाईस, जीपीएस ऍटोमॅटिक इलेक्ट्रीक डिव्हाईस, एन-95 मास्क, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, इलेक्ट्रॉनिक इअरपीस, मॅगनेटिक ईअरपीस, मॅगनेटिक इअरपीस रिमोर्व्हरस्टीक, गळय़ात घालण्यासाठीचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, चार्जर, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावलेले बनियन, वॉकिटॉकी, वॉकिटॉकी चार्जर जप्त करण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर असूनही चालणारा हेडफोन जॅक असलेले बनियन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. दोन मोबाईल संच, 179 वेगवेगळय़ा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असलेले 7 एन-95 मास्क, 41 बनियन, 445 इअरपीस, 544 चार्जिंग केबल व 6 वॉकीटॉकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दिल्ली व हैदराबादहून ही उपकरणे आणून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संजीव भंडारी व इतर साथीदारांना पुरविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.