अनगोळ-वडगाव रस्ता वाहतुकीस पुन्हा बंद, रस्ता त्वरित खुला करण्याची वाहनधारकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ-वडगाव रस्त्याचे काम रखडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई केल्याने रस्ता बंद ठेवण्यात आला होता. आता 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. त्यामुळे रस्ता बंद ठेवला असून वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
अनगोळ-वडगाव रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. वर्ष झाले तरी रस्त्याच्या विकासाचे काम पूर्ण झाले नाही. विकासकामामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. गटार बांधकाम आणि नाल्यावरील सीडीचे बांधकाम करण्यासाठी वाहतूक वळविण्यात आली होती. त्यानंतर अनगोळ परिसरातील ड्रेनेज वाहिन्या तुंबल्याने नवीन डेनेज वाहिन्या घालण्यासाठी रस्ता बंद ठेवण्यात आला होता. पण त्यानंतर रस्ता खुला करण्यात आला. आता चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याची खोदाई करण्यात येत आहे. जलवाहिन्यांकरिता खेदाई करण्यात आल्याने रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. तसेच परिसरातील रहिवाशांना धुळीचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्याचे काम वर्षभरापासून
अनगोळ-वडगाव संपर्क रस्ता वाहनधारकांना सोयीचा असल्याने अनगोळ व वडगाव परिसरातील नागरिक या रस्त्याने ये-जा करीत असतात. पण सध्या हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहनधारकांसाठी रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.