वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलींचा लिलाव होण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड न करणाऱया कुटुंबांवर त्यांच्या मुलींचा लिलाव करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. मुलींची विक्री करण्यास नकार दिल्यास त्यांच्या मातांवर बलात्कार करण्याच्याही घटना घडल्या असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षांकडून करण्यात आले आहे.
या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राजस्थान सरकारला नोटीस बजावली असून स्पष्टीकरण मागविले आहे. लिलाव होत असलेल्या मुलींचे वय 8 ते 18 वर्षे इतके असल्याचे प्राथमिक तपासामध्ये आढळले आहे. लिलावात मुली घेणारे श्रीमंत नंतर या कुटुंबांची कर्जफेड करुन देतात असेही आरोप होत असून राजस्थान सरकारने चौकशीचा आदेश दिलेला आहे.
असे लिलाव जाहिर नोटीस देऊन करण्यात येत असल्याचे मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. राजस्थानच्या पोलीस प्रमुखांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून सर्व अपराधी लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.