100 तासांची टेप आज लीक होण्याची शक्यता
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
पाकिस्तानच्या राजकारणात ऑडिओ लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान देखील बुधवारी याच्या कचाटय़ात सापडले आहेत. त्यांचीही एक ध्वनिफित समोर आली आहे. राजकीय भूकंपादरम्यान पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्य प्रमुख, आयएसआय प्रमुख आणि मंत्रिमंडळ सदस्यांसोबत राष्ट्रीय सुरक्षेवर बैठक घेतली आहे. या बैठकीत ऑडिओ लीक प्रकरणाला सामोरे जाण्यासंबंधी आणि डॅमेज कंट्रोलवर सुमारे अडीच तास चर्चा झाली आहे.
ऑडिओ लीकच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटायला कुठला विदेशी नेता देशात येणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रकरणामुळे 22 कोटी लोकांच्या देशाची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे शाहबाज यांनी बैठकीनंतर बोलताना म्हटले आहे. याचदरम्यान शुक्रवारी सुमारे 100 तासांच्या ऑडिओ टेप्स लीक होणार असल्याचे समजते. एकूण 116 तासांच्या ऑडिओ क्लिप्स किंवा टेप डार्कवेबवर आहेत असा दावा इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते फवाद चौधरी यांनी केला आहे.
कुठलाही विदेशी नेता पाकिस्तानात या ऑडिओ लीकनंतर येणार का? जर तो आला तर पंतप्रधानांच्या निवासस्थानात गुप्त चर्चा करणार का? जग आमच्यावर विश्वास कसा ठेवणार? हा अत्यंत गंभीर आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. अत्यंत उच्चस्तरीय समिती याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे पंतप्रधान शाहबाज यांनी म्हटले आहे. हॅकर्सकडून शुक्रवारी 100 तासांच्या ऑडिओ टेप्स जारी करण्यात येणार असल्याचा दावा काही पाकिस्तानी पत्रकार करत आहेत. यातील बहुतांश रेकॉर्डिंग पंतप्रधानांच्या निवासस्थानातील असल्याचे सांगण्यात येते. सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांची ऑडिओ क्लिप समोर येणार असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सैन्याने या गंभीर मुद्दय़ावर आतापर्यंत मौन बाळगले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानात रिकॉर्डिंग उपकरण सामान्य व्यक्ती ठेवू शकत नाही. यामागे आयएसआयच्या अधिकाऱयाचा हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. आयएसआयचे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यामागे असल्याचा संशय व्यक्त होतोय.