रवी कोकितकरसह दोघे जखमी : हिंडलगा येथील घटना : मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांचे कृत्य
प्रतिनिधी/ बेळगाव
श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. शनिवारी रात्री हिंडलगा येथे ही घटना घडली असून गोळीबारात दोघे जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या हल्ल्यातून दोघेही बचावले आहेत. या घटनेने बेळगावात एकच खळबळ माजली आहे.
रवी कोकितकर (वय 48, रा. हिंडलगा), कारचालक मनोज देसूरकर (वय 28, रा. बेनकनहळ्ळी) अशी जखमींची नावे असून त्यांना तातडीने केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी आदी अधिकाऱ्यांनी केएलई इस्पितळाकडे धाव घेतली असून जखमींकडून या घटनेची माहिती घेण्यात आली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
रविवारी धर्मवीर संभाजी उद्यान येथे विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या आदल्या दिवशी हा हल्ला झाला आहे. तयारीची पाहणी करून कारमधून जाताना बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील हिंडलगा मराठी शाळेजवळ स्पीडब्रेकरवर कारचा वेग कमी झाला. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली आहे.
एक गोळी रवी यांच्या मानेला घासून गेली असून दुसरी गोळी मनोजच्या हातात शिरली आहे. हा हल्ला कोणी व कशासाठी केला, याचा उलगडा झाला नाही. रात्री 7.30 ते 7.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर केएलई इस्पितळाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. रात्री उशीरापर्यंत तपास सुरू होता. या संबंधी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्याशी संपर्क साधला असता 7.30 ते 7.45 दरम्यान ही घटना घडली असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजकंटकांना अटक करा : प्रमोद मुतालिक
श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनीही या घटनेचा निषेध केला असून श्रीराम सेना अशा हल्ल्यांनी घाबरणार नाही. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाजवळ ही घटना घडली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासावे व समाजकंटकांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.