आज इंगळय़ा : बुधवारी महालक्ष्मी देवीची ओटी भरणार
बेळगाव :सालाबादप्रमाणे हनुमान जन्मोत्सवाला मजगाव येथील श्री ब्रह्मलिंग देवस्थानची गाडेयात्रा होते. मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे यात्रेत खंड पडला होता. मात्र यंदा ही यात्रा मोठय़ाने भरविण्याचा निर्णय गावकऱयांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार यावर्षी या गाडे यात्रेला मोठय़ा उत्साहाने प्रारंभ करण्यात आला आहे.
रविवार दि. 17 रोजी सायंकाळी 6 वा. हनुमान मंदिरसमोर मानाच्या गाडय़ाचे पूजन पवन काकतकर यांच्या हस्ते होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला. विविध गल्ल्यांमधील गाडे सजवून ते गाडे व बैलजोडय़ांची मिरवणूक श्री ब्रह्मदेव मंदिरासमोर आल्यानंतर श्री ब्रह्मदेव मंदिरात पुजाऱयांच्यावतीने गाऱहाणे कार्यक्रम झाला. गुलालाची उधळण करीत गाडे मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.
सोमवार दि. 18 रोजी सायंकाळी 6 वाजता इंगळय़ांचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात होणार आहे. बुधवार दि. 19 रोजी ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी मजगाव व उपनगरांतील भाविक मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहे.