प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील असंख्य गाळ्यांच्या भाडेकरूंची मुदत संपुष्टात आली आहे. अनेक गाळेधारकांनी भाडे भरण्याकडे कानाडोळा केला आहे. गाळ्यांच्या माध्यमातून व्यवसाय करून नफा मिळविणाऱ्या गाळेधारकांकडील भाडे वसूल करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र नियमितपणे आगाऊ घरपट्टी भरणाऱ्यांकडून 24 टक्के दंड वसूल केला जात असल्याने महापालिकेच्या आंधळ्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिका व्यापारी संकुल व विविध ठिकाणी 450 हून अधिक गाळे आहेत. या गाळ्यांच्या माध्यमातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र काही गाळ्यांमधील भाडेकरार संपुष्टात आला आहे. काही गाळेधारकांनी 2 ते 3 वर्षांपासून गाळ्यांचे भाडे महापालिकेकडे जमा केले नाही. तसेच लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकडेदेखील कानाडोळा केला जात आहे. भाडे भरले नसल्याने महापालिकेला महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. अनेक गाळेधारकांनी भाडे न भरता गाळ्यांचा वापर सुरू ठेवला आहे. गाळ्यांचे भाडे भरण्याची सूचना केली असता मुदत घेऊन वेळ मारून नेली जाते. शहरातील विविध मार्केटमधील गाळ्यांच्या भाडेकराराची मुदत संपून 2 ते 4 वर्षे झाली. पण भाडेकरार नूतनीकरण करण्याकडे पाठ फिरविली आहे.
महापालिकेनेदेखील भाडे वसूल करण्याकडे किंवा गाळे रिकामी करून गाळ्यांचा ताबा घेण्याकडे कानाडोळा केला आहे. परिणामी महापालिकेला लाखो रुपये महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. गाळ्यांचा वापर व्यवसायासाठी केला जातो. पण गाळेधारकांनी भाडे भरण्यास टोलवाटोलवी चालविली आहे. या गाळेधारकांवर कठोर कारवाई करण्याबाबत महापालिका प्रशासन कोणतीच ठोस पावले उचलत नाही. मात्र नियमितपणे घरपट्टी भरणाऱ्यांकडून प्रतिमहिना दोन टक्केप्रमाणे वर्षाला 24 टक्के दंड वसूल केला जातो. वास्तविक पाहता घरे राहण्यासाठी वापरली जातात. अनेक मालमत्ताधारक आगाऊ घरपट्टी भरतात. पण एखाद्या मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरण्यास विलंब केल्यास 2 टक्के प्रतिमहिना दंड वसूल करण्याचा प्रकार चालविला आहे. व्यवसाय करणाऱ्यांना सूट आणि नियमित घरपट्टी भरणाऱ्यांना भुर्दंड आकारण्याचा प्रकार महापालिका प्रशासनाने चालविला आहे. त्यामुळे महापालिकेच्या गैरकारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.