नव्या उत्पादनांवर असणार भर ः मार्चअखेर महसुलात 13 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
पादत्राणाच्या क्षेत्रामध्ये नावाजलेली कंपनी बाटा इंडिया ही आगामी काळामध्ये नवनवी उत्पादने सादर करण्यासोबत व्यवसाय विस्ताराला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे.
बाटा इंडियाला मार्च अखेर संपलेल्या तिमाहीत महसुलामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 13 टक्के वाढ नोंदवता आली आहे. ओमिक्रॉनच्या फैलावामुळे कंपनीच्या पादत्राणांच्या विक्रीवर त्या काळात परिणाम जाणवला होता. परंतु आता परिस्थिती सुधारली असून पादत्राणांच्या विक्रीने पुन्हा एकदा तेजीकडे झुकण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये महसुलामध्ये कंपनीने 40 टक्के वाढ नोंदविली आहे. बाटा इंडियाच्या या वाढीव विक्रीच्या वाटय़ामध्ये ‘स्निकर’च्या उत्पादनांची संख्या जास्त आहे. एकंदर विक्रीमध्ये स्निकरच्या उत्पादनांनी 20 टक्के योगदान दिले आहे. प्रँचायझी तत्त्वावर कंपनीच्या स्टोर्सची संख्या 75 टक्के वाढून 303 वर पोहोचली आहे.
शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून सामाजिक कार्यक्रम तसेच कार्यालयेही नियमितपणे सुरू झाली असल्याने पादत्राणांची मागणी वाढताना दिसते आहे. येणाऱया काळातही यामध्ये वाढ झाली तर नवल वाटायला नको. आगामी काळात प्रिमियम आणि इतर श्रेणीतील पादत्राणांची मागणी वाढण्याची शक्यता सांगितली जात आहे.