ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुकवर मतदान करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ईव्हीएमवरील कोणतं बटण दाबलं आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पाटील म्हणाल्या, मी फेसबुकवर मतदान करतानाचा फोटो शेअर केला आहे. तो फोटो मला कसबा मतदारसंघातील एका मतदाराने पाठविलेला आहे. मुळात मी अजून मतदानच केलं नाही. त्यामुळे मी गोपनियतेचा भंग केलेला नाही. कसब्यातील मतदार सुज्ञ आहेत. मी शेंगा खाल्ल्या नाहीत. त्यामुळे मी टरफले उचलणार नाही, अशा शब्दात त्यांनी कारवाईची मागणी करणाऱ्यांना टोलाही लगावला.
दरम्यान, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार मतदान हे गोपनीय असतं. मतदाराला त्याने कुणाला मतदान केलं, याबद्दल गुप्तता बाळगावी लागते. जर मतदाराकडून गोपनीयतेचा भंग झाला, तर त्याच्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार कारवाई होते.