शिया समुदाय पुन्हा लक्ष्य ः 27 जखमी
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका शैक्षणिक संस्थेत स्फोट झाला आहे. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेला हा तिसरा मोठा हल्ला होता. यापूर्वी एका मशिदीत आणि रशियाच्या दूतावासाबाहेर स्फोट झाला होता.
अफगाणिस्तानच्या शैक्षणिक संस्थेत शुक्रवारी स्फोट झाला असून तो आत्मघाती स्वरुपाचा होता. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. येथे हजारा मुस्लिमांची संख्या अधिक आहे. हा समूह मागील काही महिन्यांपासून सातत्याने दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरल्याचे काबूल पोलीस विभागाचे प्रवक्ते खालिद जादरान यांनी सांगितले.
आत्मघाती हल्लेखोराने शैक्षणिक संस्थेत स्फोट घडवून आणला. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. स्फोटानंतर शैक्षणिक संस्था अन् त्याच्या परिसरात सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे.
यापूर्वी 2 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील गुजरगाह मशिदीत बॉम्बस्फोट होत 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर 200 जण जखमी झाले होते. स्फोटात मशिदीचे इमाम मौलवी मुजीब रहमान अंसारींचाही मृत्यू झाला होता. तर 6 सप्टेंबर रोजी काबूलमधील रशियाच्या दूतावासाबाहेर आत्मघाती हल्ल्यात रशियाच्या 2 अधिकाऱयांसह 20 जणांचा मृत्यू झाला होता.