2 रशियन राजनैतिक अधिकाऱयांसह 20 ठार
@ काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील दारुल अमान भागात रशियन दुतावासाबाहेर आत्मघाती हल्ला झाला. सोमवारी झालेल्या स्फोटात दोन रशियन अधिकाऱयांसह 20 जणांचा मृत्यू झाला आहे. एका आत्मघाती हल्लेखोराने रशियन दुतावासाबाहेर स्वतःला जाळून घेतले. स्फोटावेळी काही अफगाण नागरिक व्हिसा घेण्यासाठी तिथे उपस्थित होते. या रांगेतील काही लोक या दुर्घटनेत जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या स्फोटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्विकारलेली नाही. तथापि, रशियन अधिकाऱयांना टार्गेट करण्याच्या उद्देशानेच हा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
रशियन दुतावासाबाहेर एक संशयित फिरत असल्याचे सुरक्षा अधिकाऱयांच्या निदर्शनास आले. सुरक्षा अधिकाऱयांनी गेटजवळ त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने स्वतःला पेटवून घेत आत्मघाती स्फोट केला. हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळीच काहीजणांचा मृत्यू झाला. यापूर्वी 2016 मध्ये अफगाणिस्तानमधील रशियन दुतावासाजवळ स्फोट झाला होता. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 20 हून अधिक लोक जखमी झाले होते.