कर अहवालात केला होता फेरफार ः मंत्र्यासाठीच्या संहितेच्या उल्लंघनाचा आरोप
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रविवारी कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे अध्यक्ष नादिम जहावी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. सुनक यांनी जहावी यांच्या करविषयक प्रकरणांच्या स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले हेते. जहावी यांनी कर अहवालात फेरफार केल्याचे चौकशीत आढळून आले होते. या कृत्याद्वारे त्याने मंत्र्यांसाठीच्या संहितेचे गंभीर उल्लंघन केले होते.
मागील वर्षी जुलैमध्ये तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जहावी यांना अर्थमंत्री म्हणून नियुक्त केले होते. लिझ ट्रस यांच्या कार्यकाळातही त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. सुनक यांनी पंतप्रधान झाल्यावर जहावी यांची पक्षाध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती. तसेच सुनक यांच्या मंत्रिमंडळात ते बिनखात्याचे मंत्री होते.
सुनक यांनी पत्र पाठवून जहावी यांना पदावरून हटविल्याची माहिती दिली आहे. स्वतंत्र सल्लागाराने चौकशीचे निष्कर्ष आम्हा दोघांसमोर मांडले आहेत. मंत्र्यांसाठीच्या संहितेचे गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पट आहे, याचमुळे सरकारमधील पदावरून जहावी यांना हटवत असल्याचे सुनक यांनी म्हटले आहे.
जहावी हे स्वतःच्या करभरणावरून दिशालभूल करत होते. जुलै महिन्यात जहावी यांनी मांडलेला कर विषयक अहवाल स्पष्ट स्वरुपात खराब होता असे स्वतंत्र सल्लागार लॉरी मॅग्नस यांना आढळून आले आहे. जहावी हे स्वतःच्या कर विषयक घोषणांवरून निष्काळजी होते, असे ब्रिटिश टॅक्स अथॉरिटीने म्हटले आहे. तर कमी कर भरावा लागावा म्हणून कुठलाच फेरफार केला नसल्याचा दावा जहावी यांनी केला आहे.