ऐनापूर नगरपंचायत व्याप्तीतील व्यावसायिकांची मागणी
बेळगाव : कागवाड तालुक्यातील लहान व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. मात्र मागील काही दिवसांत कोरोनामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यासाठी ऐनापूर नगरपंचायतीने व्यावसायिक कर भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. कागवाड, ऐनापूर परिसरात लहान मोठ्या व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे उद्योग, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे भाडेकरार वेळेत भरणे झाले नाही. या व्यवसायावरच आपला उदरनिर्वाह चालतो. मात्र सध्या कर भरण्यासाठी नगरपंचायतीकडून नोटिसा दिल्या जात आहेत. मात्र सद्यपरिस्थितीत भाडेकर भरणे शक्य नाही. त्यामुळे नगरपंचायतीने आम्हाला वेळ वाढवून द्यावा, अशी मागणीदेखील नगरपंचायत व्याप्तीतील व्यावसायिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
काही वेळ वाढवून दिल्यास आपण कर भरण्याचा प्रयत्न करतो. मात्र सध्या तातडीने कर भरा, असा तगादा लावण्यात येत आहे. परिणामी आता याकडे गांभीर्याने लक्ष देवून कर भरण्यास मुभा देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. नगपंचायत कार्यक्षेत्रातील व्यावसायिक यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित होते.