पुणे : राज्य मंडळाने शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेत प्राविण्य मिळवणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सादर करण्याला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळांच्या माध्यमातून उद्यापासून (दि.20) प्रस्ताव सादर करता येणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. या पूर्वी अंतिम मुदत 8 फेब्रुवारी होती.
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱया व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण दिले जातात. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून मागणी झाल्याने अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सादर करायला 8 फेब्रुवारीपर्यत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे निर्धारीत करण्यात आलेल्या वाढीव मुदतीत माध्यमिक शाळांना अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सादर करता आले नाही. त्याचप्रमाणे कोणताही पात्र विद्यार्थी अतिरिक्त गुणांपासून वंचित राहू नये म्हणून शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सोमवार 20 मार्चला 5.00 वाजेपर्यंत माध्यमिक शाळांकडून स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ अंतिम असेल, यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही ओक यांनी सांगितले.
अधिक वाचा : शिंदे-फडणवीस सरकारचे आता डोळे उघडले, आ. धंगेकर यांचा टोला