रोजच्या जीवनात सर्वाधिक कार्यरत असणारे, वापरले जाणारे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे. त्यांना उन्हाची झळ बसू नये, त्यांचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असणाऱ्या मोबाईल-टॅब-लॅपटॉपच्या जमान्यात आपण आपले डोळे अतिप्रमाणात, तसेच बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने वापरत असतो. या सर्व जादुई यंत्राशिवाय दैनंदिन कामे करणे जवळपास अशक्य आहे, हे जरी खरे असले, तरी ही यंत्रे ज्या डोळ्यांच्या माध्यमातून आपण वापरू शकत आहोत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हे नक्कीच हितकर नाही. एक वेळ ही सर्व यंत्रे आपण ‘अपडेट’ करू शकतो, बदलू शकतो, पण डोळे बदलून मिळण्याचे तंत्रज्ञान अजून तरी उपलब्ध झालेले नाही, हे लक्षात ठेवायला हवे.
डोळ्यांना उन्हाची झळ बसू नये, स्वास्थ्य बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.या तक्रारी निर्माण होऊ नयेत म्हणून डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, लक्षणे निर्माण होत असल्याचे जाणवताच अथवा झाल्यावर कोणते घरगुती उपाय करावेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याचीही माहिती करून घ्यायला हवी.
डोळ्यांना सूज येणे, चिकट स्राव येणे, अशी जंतुसंसर्गाची लक्षणे दिसत असल्यास नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषधांच्या दुकानातून कोणतेही आय ड्रॉप्स विकत घेऊन डोळ्यांत घालू नयेत.
कारण काही वेळा त्यामुळे उपाय होण्याऐवजी अपाय होणे अधिक संभवते.
साध्या पाण्याने दिवसातून दोन-तीन वेळा डोळे स्वच्छ धुवावेत.
रात्री झोपताना डोळ्यांवर गुलाबपाणी यात भिजवलेल्या पट्ट्या अथवा काकडी, कोरफडीच्या गराचे तुकडे पाच-दहा मिनिटांसाठी ठेवावेत.
दर वीस मिनिटांनी, वीस सेकंदांसाठी, वीस फुटांपेक्षा लांबवरची वस्तू पाहणे.
अधूनमधून डोळे बंद करून हातांनी हलकेच झाकावेत, दीर्घ श्वसन करावे.
याशिवाय डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी योग्य आहार घ्यावा. तुमच्या आहारात विटामिन आणि मिनरल चा समावेश असायला हवा. गाजर, गहू, हिरव्या पालेभाज्या, डाळी, काजू बदाम, अक्रोड, अंजीर आणि सोयाबीन इत्यादींना आहारात सामील करावे.
डोळ्यांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी दररोज सकाळी चप्पल न घालता गवतावर चालावे.
डॉक्टरांकडे केव्हा जावे
जर तुम्हाला डोळ्यातून दिसणे फारच कमी झाले आहे तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. डोळ्यांची समस्या अधिकच वाढली असेल तर कोणताही उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.