मागणी पूर्ण झाल्याने काँग्रेस गटाकडून समाधान
प्रतिनिधी /कुडचडे
सावर्डे मुख्य जंक्शनवर काँग्रेस गटाने पंचायतीला दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन नाम व दिशादर्शक फलक लावल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते व अन्य स्थानिकांकडून पंचायतीचे आभार मानण्यात आले आहेत तसेच समाधान व्यक्त करण्यात आलेले आहे.
सावर्डे येथील मुख्य जंक्शनवरून फोंडा, धारबांदोडा, कुडचडे, सांगे येथे रस्ते जातात व येथून कित्येक लोकांची तसेच पर्यटक आणि व्यावसायिक वाहनांची ये-जा चालू असते. पण व्यवस्थित दिशादर्शक फलक नसल्याने बऱयाच लोकांची नाहक अडचण व्हायची. त्याची दखल घेत सावर्डे काँग्रेस गटाने मे, 2020 मध्ये सदर जंक्शनवर रस्ता ज्या भागाकडे जातो त्याचे नाव व ती बाजू दाखविणारा फलक लावण्याची मागणी करून सावर्डे पंचायतीत तसे निवेदन सादर केले होते आणि त्यावेळी तात्पुरता मार्ग दर्शविणारा कागदी फलक लावला होता.
सावर्डे पंचायतीतर्फे नुकताच सदर जंक्शनवर विविध गावांची नावे व त्याकडे जाणारा मार्ग दर्शविणारा पक्का फलक लावण्यात आला आहे. त्याबद्दल सावर्डे पंचायतीचे सावर्डे काँग्रेस कार्यकर्ते गौतम भंडारी यांनी आभार मानले आहेत. आपल्या भागात येणाऱया अतिथींना त्रास होणार नाहीत याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. याच हेतूने दोन वर्षांअगोदर दिशादर्शक फलक लावण्यासाठी सावर्डे पंचायतीत निवेदन दिले होते. त्याची दखल घेत निवेदनात केलेली मागणी पंचायत मंडळाने पूर्ण केल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो, असे काँग्रेस कार्यकर्ते संकेत भंडारी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पुढे कोणीही सार्वजनिक बाबींसंबंधी पंचायतीला निवेदन दिले, तर त्याची त्वरित दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करावी. त्यामुळे जनतेच्या अडचणी दूर होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.