लाखाहून अधिक फॉलोअर्स ; ४ लाख रुपये उकळले
निपाणी : एका भामट्यांचे निपाणी ग्रामीण पोलीसस्थानकाचे पीएसआय अनिलकुमार कुंबर यांच्या नावे इन्स्टावर फेक अकाऊंट बनवून तब्बल ५० महिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भामट्याला अथणी येथून पोलिसांनी आज ताब्यात घेतलं.
विजयकुमार बराली (वय २८ रा. अथणी) असे या भामट्याने नाव असून या फेक अकाऊंटवर त्याचे तब्ब्ल लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीएसआय अनिलकुमार कुंबर यांनी आपल्या नावे इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट असल्याची तक्रार सीईएन गुन्हे पोलीस स्थानकात दिली होती. बेळगाव जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी सखोल तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विजयकुमार याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशी दरम्यान विजयकुमारने या बनावट अकाऊंटद्वारे पीएसआय असल्याचे सांगून अधिकाधिक लोकांशी मैत्री केली. तसेच या अकाऊंटच्या माध्यमातून त्याने ५० हून अधिक महिलांना नोकरीचे व इतर आमिष दाखवून ४ लाख उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यादरम्यान त्याचे तब्बल १ लाख १२ हजार फॉलोअर्स बनले. तसेच आरोपीने इन्स्टावर असेच आणखी ९ फेक अकाऊंट बनवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
पीएसआय एच एल धर्मट्टी, पीएसआय ए एच भजंत्री, के. आर. इमामवार, जी. एस. लामाणी, एस. आय. भांडी, एन. आर. घडेप्पानवर , इराण्णा अनिताहल्ली व सी ए केलागडे यांनी ही कारवाई केली.