पोलीस अधीक्षक समीर शेख आक्रमक, बनावट गुटख्याच्या रॅकेटचा पर्दाफाश
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात तृप्ती चायनिज सेंटरमध्ये विमल व आरएमडी या गुटख्याचे बनावट उत्पादन बनवले जात होते. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस पथकाच्या टीमने छापा टाकत बनावट गुटखा बनवणाऱया वैभव पावसकरच्या मुसक्या आवळत बनावट गुटखा बनवणाऱयांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्याचबरोबर याची विक्री व वाहतुक करणाऱयांनाही पाच जणांना अटक करुन दोन इनोव्हा कार, एक रिक्षासह 36 लाख 39 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचबरोबर वैभव पावसकर ज्या मशिनवर गुटखा बनवत होता तीही मशिन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून समीर शेख यांनी अवैध व्यवसायांवर धाडसत्र सुरू केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला सलाम ठोकत आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीपक राजगौंडा पाटील (वय 36, रा. शिरदवाड, जि. बेळगाव), ललित सुमेरमल काछिया (वय 56, रा. सुरुर, ता. वाई), तेजस अवघडे (वय 22), आदित्य हरिश्चंद्र अवघडे (वय 22 रा. दुर्गापेठ), अनुष चिंतामणी पाटील (वय 19, रा. गुरुवार पेठ), वैभव रवींद्र पावस्कर (वय 35, रा. शुक्रवार पेठ) या सहा जणांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतुक करणाऱया व बाळगणाऱयाची माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत. दि. 5 रोजी त्यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इनोव्हा कार क्र. (एम. एच. 12 ई एम 1883) मधुन बंदी असलेला गुटखा बावधन नाका वाई येथे येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे बावधन नाका वाई येथे सापळा लावला. रविवारी सकाळी सहा वाजता ती इनोव्हा कार बावधन नाका येथे आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ती कार ताब्यात घेतली असता त्यामध्ये 5 लाख 75 हजार 840 रुपयांचा गुटखा हस्तगत केला. त्या चालकाच्या ताब्यात इनोव्हा कारसह गुटखा असा एकुण 15 लाख 75 हजार 840 रुपयाचा ऐवज हस्तगत केला.
त्यानंतर सुरुर (ता. वाई) येथे इनोव्हा कार क्र. (एम. एच. 01 ए एम 4537) यामधुनही गुटखा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरुर फाटा (ता. वाई) येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावला असता दि. 5 रोजी सकाळी 8.50 वाजता इनोव्हा कार आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इनोव्हा कार ताब्यात घेतली. त्यामध्ये 4 लाख 75 हजार 972 रुपये किंमतीचा गुटखा मिळुन आला. त्या चालकाच्या ताब्यात एकुण 10 लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार व गुटखा असा एकूण 14 लाख 75 हजार 972 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
तसेच चारभिंती सातारा येथे रिक्षा क्रमांक एम.एच.11 सी.जे. 2505 मधून 3 जण बनावट आर. एम. डी. गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावुन दि. 5 रोजी दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास ऑटो रिक्षा त्यामधील 3 जण ताब्यात घेतले. त्यांच्यांकडून 1 लाख 87 हजार 200 रुपये किंमतीचा बनावट गुटखा हस्तगत केला. तसेच ऑटोरिक्षामधील त्या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी तो बनावट गुटखा तृप्ती चायनीज सेंटरचा मालक वैभव पावसकर याने त्याच्या चायनीज सेंटरमध्ये मशीनवर बनवला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी लगेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱयांना बोलावून दोन्ही इनोव्हा कारमधील तसेच रिक्षामधील गुटखा जप्त करुन तृप्ती चायनीज सेंटरवर देखील छापा टाकला. तेथे ठिकाणी 2 लाख रुपये किंमतीची “ब्लेंडीग ऍण्ड पॅकिंग मशीन मिळुन आली. ती जप्त करण्यात आली असुन बनावट गुटखा बनवणारा वैभव पावसकर यास देखील ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने दि. 5 नोव्हेंबर रोजी प्रतिबंधीत गुटख्याच्या बाबतीत विशेष मोहिम राबवुन एकाच दिवसात तीन ठिकाणी गुटख्याची कारवाई करुन 12 लाख 39 हजार 12 रुपयेचा प्रतिबंधीत गुटखा, 2 इनोव्हा कार, 1 ऑटोरिक्षा व बनावट गुटखा तयार करण्याचे “ब्लेंडीग ऍण्ड पॅकिंग मशीन असा एकूण 36 लाख 39 हजार 12 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अनुक्रमे वाई पोलीस ठाणे, भुईंज पोलीस ठाणे तसेच सातारा शहर पोलीस ठाणे येथे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर यांच्या अधिपत्याखाली सपोनि रमेश गर्जे, पोउनि मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, संतोष पवार, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे, शिवाजी गुरव तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडील निरीक्षक इम्रान हवालदार, रोहन शहा व श्रीमती वंदना रूपनवर यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
अवैध धंद्यावर कारवाईचा धडका सुरू
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिह्यात सुरू असेलल्या अवैध धंद्यावर कारवाईचा धडका सुरू केला आहे. मटका, जुगार अड्डयावर छापा टाकून त्यांनी बडय़ा धेंडय़ांच्या मुसक्या लवकरच आवळणार असे संकेत दिले आहेत. तोच 15 लाखांचा गुटखा जप्त करून अवैध धंद्याना पायबंद घातला आहे. या कारवाईची चर्चा सातारा जिह्यात होत आहे. यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख हे ऍक्शन मोडमध्ये आले असून पोलीस कर्मचारीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रीय झाले आहेत.