माजी केंद्रीय मंत्री होते राजू
वृत्तसंस्था/ हैदराबाद
माजी केंद्रीय मंत्री आणि दिग्गज अभिनेते उप्पलपति कृष्णम राजू यांचे रविवारी पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. निधनासमयी ते 83 वर्षांचे होते. बाहुबली चित्रपटातील अभिनेता प्रभास यांचे ते काका होते. कोरोना संक्रमणानंतर उद्भवलेल्या आरोग्य विषयक समस्यांनी त्रस्त होते. त्यांना 5 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कृष्णम राजू हे दोनवेळा लोकसभा सदस्य राहिले आहेत. तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले होते. ‘रिबेल स्टार’ या नावाने प्रसिद्ध राजू यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि स्वतःच्या वैशिष्टय़पूर्ण भूमिकांमुळे ते चर्चेत राहिले. त्यांनी स्वतःच्या कारकीर्दीची सुरुवात 1966 मध्ये तेलगू चित्रपट ‘चिलाका गोरिंका’द्वारे केली होती. त्यांना अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बांदी संजय कुमार यांनी कृष्णम राजू यांचा मृत्यू दुःखद असल्याचे म्हणत भाजप, तेलगू चित्रपटसृष्टी आणि लोकांसाठी ही मोठी हानी असल्याचे उद्गार काढले आहेत.