खाजगी सावकार, सोसायटी, गावचा फंड काढले होते कर्ज
सातारा प्रतिनिधी
लोहारे (ता.वाई) येथील नारायण गणपत सपकाळ (वय 48) यांनी कारखान्याला दोन वर्षांपूर्वी ऊस घातला होता. त्याचे वेळेवर बिल न मिळाल्याने मुलाला मिल्ट्रीत भरती करण्यासाठी व वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी कर्ज काढलेली होती. त्या कर्जाच्या ओझाच्या टेन्शनमध्ये शेतातल्या सागवानच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना दि.24रोजी सकाळी 9 वाजता घडली. या घटनेने वाई तालुक्यात खळबळ उडाली असून त्यांनी खाजगी सावकार, सोसायटी आणि गावच्या फंड यामधून कर्ज काढले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोहारे येथील नारायण सपकाळ हे शेती करत होते. शेतीला जोड व्यवसाय पशुपालन ही करायचे. त्यांचा ऊस तीन वर्षांपूर्वी एका कारखान्याला घातला होता.त्या कारखान्याने वेळेत ऊसाचे बिल दिले नाही. त्यामुळे घरखर्च, मुलांना शिक्षण, आजारपण यासाठी खाजगी सावकारकडून कर्ज घेतले तसेच मुलाना मिल्ट्रीत लावण्यासाठी एकाला पैसे ही दिले. ते ही कर्ज काढून कर्जाला कर्ज वाढत गेले. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढले. त्यात कारखान्याने बिल दिले नाही. वडिलांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी पैसे पुन्हा खाजगी सावकाराकडून घेतले. यामुळे सपकाळ हे सतत मानसिक तणावाखाली होते. त्याच तणावात ते सतत असायचे गावातील त्यांच्या मित्राला ते आपले कर्जाचे सतत बोलायचे. त्यांनी शेतात सागवानाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटने बाबत तपासी अंमलदार कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दुःखात आहेत कुटूंबिय मी नंतर डिटेल माहिती घेणार आहे कोणाचे किती कर्ज आहे कोणी त्यांची फसवणूक केली ती असे सांगितले.