हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा बळी
बेळगाव : जनावरांसाठी शेतात गवत आणण्यासाठी गेला असता विजेच्या तारेचा स्पर्श होऊन बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. भरमा सुबाण्णा चिक्के (वय 75) असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. भरमा हे उचगाव-कोवाड रस्त्यावरील आपल्या शेताकडे चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतामधून गेलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे जोरदार धक्का बसून ते खाली कोसळले. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच काहींनी त्याठिकाणी धाव घेतली. काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. काकती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल झाली आहे.
सणादिवशीच दुर्घटना घडल्यामुळे हळहळ
भरमा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ऐन सणादिवशीच ही घटना घडल्यामुळे बेकिनकेरे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हेस्कॉमच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त होत असून अनेक ठिकाणी विद्युततारा झाडाजवळूनच गेल्या आहेत. चुकून जरी स्पर्श झाला तर अशा घटना घडत आहेत. तेव्हा लोंबकळणाऱ्या विद्युततारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.