प्रतिनिधी/ गगनबावडा
वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर गवा रेड्याने केलेल्या हल्ल्यात चौधरवाडी ता. गगनबावडा येथील शेतकरी जखमी झाला आहे. शिवाजी श्रीपती शेलार (वय ४०) असे त्यांचे नांव आहे.सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
सायंकाळी पाचच्या सुमारास सुतारमळा नावाच्या शेतात शिवाजीसह अन्य शेतकरी ऊसतोड करत होते. उसामध्ये असलेल्या गव्याच्या हालचालीचा अंदाज आला नाही. पाठीमागून जोराची धडक मारल्यामुळे ते बांधाच्या खाली पडले. डाव्या पायाच्या मांडीस मोडी जखम झाली आहे. प्रसंगावधान राखून स्वतःला सावरले व गव्याच्या धडकेतून सुटका करून घेतली.वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले आहे.
आणखी किती बळी घेणार?
शेतकरी सकाळी वैरण आणण्यासाठी शेतामध्ये गेले असता उसात बसलेले गवे शेतकऱ्यांवर दिवसाढवळ्या हल्ले करतात. धामणी परिसरात हे प्रकार वाढत आहेत. शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.