संबंधित धनगराला देण्यात आली ताकीद
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील अवचारहट्टी रस्त्यावर असलेल्या खुल्या जागेमध्ये गेल्या काही दिवसांपासून धनगरांनी ठाण मांडले आहे. येळ्ळूरचा कचरा टाकण्याचा जो डेपो आहे त्याच्या बाजुलाच या धनगरांनी बकऱयांसह वस्ती केली आहे. त्यांना अनेकवेळा समज देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांना बोलावून घेऊन त्या धनगरांना तेथून जाण्याची सूचना करण्यात आली आहे.
रात्रभर त्या ठिकाणी थांबायचे त्यानंतर दिवसभर बाजुला असलेल्या गवताच्या कुरणामध्ये किंवा शिवारात बकरी सोडायची, असा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी वैतागला आहे. याबाबत ग्राम पंचायतमध्ये अनेकांनी तक्रारी केल्या. त्यानंतर ग्राम पंचायत पिडीओ आणि तलाठी यांनी त्याठिकाणी जाऊन त्यांना सूचना केली. मात्र त्या धनगरांनी दादच दिली नाही.
त्यामुळे मंगळवारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या काही पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी गेले. यावेळी धनगराने ही आपलीच जागा आहे. आमचे या ठिकाणी मंदिर आहे, असे सांगितले.
मात्र या ठिकाणी तुमचा कोणताही संबंध नाही. तेंव्हा येथून तुमची बकरी घेऊन निघून जाण्यास त्यांना सांगण्यात आले. यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. यावेळी ग्राम पंचायत पिडीओ अरुण नाईक, तलाठी मयुर मासेकर, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, दयानंद उघाडे, प्रमोद पाटील, जोतिबा चौगुले, राकेश परीट यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.