Tarun Bharat

कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीवर शेतकऱयांचा धडक मोर्चा

शेतीपिकांचे नुकसान करणाऱया डुक्कर-मालकांचा बंदोबस्त करण्याची मागणी : अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांना धरले धारेवर

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

हजारो एकर शिवारातील भातपीक, हिरवा-सुका चारा व परिसरातील अन्य पिकांचा फडशा पाडून लाखो रुपयांचे नुकसान करणाऱया डुक्कर व डुक्कर मालकांचा त्वरित बंदोबस्त करावा. तसेच मालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी कंग्राळी बुद्रुक येथील हजारो शेतकरी व महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढून केली. आणि संताप व्यक्त करुन ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना चांगलेच धारेवर धरले.

डुकरांनी शिवारातील उभे भातपीक फस्त केल्यामुळे आमच्यावर व जनावरांवर उपासमारीची वेळ आल्याच्याही संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत होत्या.

गावच्या पूर्व, दक्षिण व उत्तर भागामध्ये शेतकरी पावसाळी भातपीक घेतो. उन्हाळय़ात कडधान्य, जोंधळा, मका अशी पिके घेतो. वरील भागात सुपीक जमीन असल्यामुळे या भागातील शेतकरी वर्षभर शेतामध्ये पिकविलेल्या भातावरच उदरनिर्वाह करतो. जनावरांसाठी पावसाळय़ामध्ये हिरव्या चाऱयाची तर उन्हाळय़ामध्ये सुक्या चाऱयाची व्यवस्था होते. परंतु या परिसरात डुकरांकडून वरचेवर होत असलेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग वैतागला आहे.

25 वर्षांपासून डुकरांचा हैदोस

गेल्या 25 वर्षांपूर्वी गाव मर्यादित होते. परंतु सध्या गावच्या पूर्व दिशेला कलमेश्वर नगर, वैभवनगर, शास्त्रीनगर, संताजीनगर अशी नवीन नगरे झाली तर दक्षिणेला शाहूनगर, पार्वतीनगर, साई कॉलनी अशा नगरांची निर्मिती झाली. या बरोबरच डुक्कर मालकांची संख्यासुद्धा वाढली. डुक्कर मालक रात्री डुकरांच्या पिलांना सोडतात. मोठी झाल्यावर त्यांची विक्री करतात. त्यामुळे डुक्कर मालकांचा बिनखर्ची व्यवसाय तेजीत चालला आणि बघता बघता डुक्कर पाळणाऱयांची संख्या वाढली. परंतु या डुकरांमुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होते. याचा कोणी विचार केला आहे.शेतकऱयांनी ग्रामपंचायतीला वारंवार डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदने दिली. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. ग्रामपंचायतीनेही डोळेझाक केली. दरम्यानच्या काळात डुक्कर मालक व्यवसाय करुन मात्र श्रीमंत झाले.

यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, माजी उपाध्यक्ष अनिल पावशे यांनीही शेतकऱयांची मागणी सार्थ असल्याचे सांगितले.

मल्लेशी बुंडी, सुरेश राठोड, दादासाहेब भद्दरगडे, नवनाथ पुजारी, बाबू दोडमनी, बंदेनवाज सय्यद, उमेश पाटील, रेखा इंडिकर, वेदिका पठाणे, वंदना चव्हाण, फकिरव्वा बेळगावीसह शेतकरी व महिला व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षकांचे शेतकऱयांना शांततेचे आवाहन

डुक्कर व डुक्कर मालकांचा त्वरित बंदोबस्त करुन त्यांच्यावर कारवाई करा अशा घोषणा देत नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त होताचा ग्रा. पं. ने डुक्कर मालक प्रभू अथणी याला बोलावून घेतले. त्यांच्या आणखी साथीदारांनाही बोलावून घेण्यास सांगितले. परंतु ते आलेच नाहीत. तेव्हा शेतकऱयांनी ते सर्व येईपर्यंत त्याला बांधून ठेवण्याची मागणी करताच, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतीने काकती पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलगुंद यांना बोलावून घेतले. पोलिसांनी शेतकऱयांना शांततेचे आवाहन करत मंजुनाथ व त्यांच्या सहकाऱयांना येत्या तीन दिवसांमध्ये परिसरातील सर्व डुकरे पकडून नेण्याच्या सूचना देत त्यांच्याकडून तसे लेखी लिहून घेण्यासाठी पोलीस ठाण्याला नेले. यावेळी महिला शेतकऱयांनीही डुकरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी उचलून धरली.

Related Stories

हवालदार ए. एन. तुक्कार यांना मुख्यमंत्री पदक बहाल

Amit Kulkarni

प्रत्येकाने नेत्रदान करणे आवश्यक

Amit Kulkarni

वादळी पावसामुळे शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान

Amit Kulkarni

रायबागमधील चौघा जणांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

सामाजिक महिला कार्यकर्त्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Amit Kulkarni

हिरेबागेवाडीहून मुतग्याला आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!