लोणावळा : गवळीवाडा येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यावर अन्य अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्र व फायटरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात एक शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
अकिब अमिर शेख (वय 16, रा. गणपती चौक कामशेत) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याने स्वतःच या घटनेची फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव भागात राहणारी दोन 15 वर्षाची मुले व आगवाला चाळ येथे राहणारा एक 16 वर्षाचा मुलगा या तिघांनी शुक्रवारी (24 मार्च) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अकिब शेखवर जीवघेणा हल्ला करत त्याला जखमी केले. गवळीवाडा येथील व्हिपीएस शाळेच्या जवळील रस्त्यावर या तिघांनी शेख याला पकडत त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला व फायटरने डोक्यात मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात अकिब शेख गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोरांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुजावर याबाबत अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार?