अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना प्रांतातील लॉरा किन यांचा आजही त्यांच्या भाग्यावर विश्वास बसत नाही. ख्रिसमसच्या शॉपिंगसाठी त्या एका ट्रकमधून निघाल्या होत्या. ट्रकमध्ये तेल भरण्यासाठी एका पंपावर त्या थांबल्या. तेथेच एक लॉटरीवाला तिकिटे विकत होता. त्यांनी ट्रकमध्ये तेल भरले जात असताना सहज म्हणून या लॉटरीवाल्याकडून एक तिकीट विकत घेतले.
ट्रकमध्ये इंधन भरण्याचे काम झाल्यानंतर त्या मार्गस्थ झाल्या. त्यांनी खरेदी आटोपली. लॉटरीचे तिकीट काढल्याचे त्या इतर गडबडीत विसरूनही गेल्या होत्या. आपल्या सहकाऱयाबरोबर त्यांनी ख्रिसमसची खरेदी केली. यथास्थित खरेदी आटोपून घरी गेल्यानंतर त्यांना समजले, की त्यांच्या तिकिटाला 8 कोटी रुपयांचे (10 लाख डॉलर्स) बक्षीस लागले आहे. हे वृत्त कळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ट्रकमध्ये इंधन भरण्यास आपण पेट्रोल पंपावर थांबलो नसतो तर आपले भाग्य उजळले नसते. त्यामुळे हा पंप माझ्यासाठी अत्यंत लाभदायक ठरला आहे, असे त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोणाचे नशीब केव्हा आणि कसे उजळेल, हे सांगता येत नाही असे म्हणतात. त्याचे प्रत्यंतरच या घटनेवरून येते, अशी प्रतिक्रिया आता त्यांच्यासंबंधी व्यक्त होत आहे.