प्रतिनिधी /मडगाव
इस्टरच्या पवित्र दिवशीच आंबेली-वेळ्ळी येथे 50 वर्षीय मुलीने आपल्या 76 वर्षीय बापाची हत्या करण्याची घटना काल रविवारी पहाटे 4 वाजण्यास घडली. उपलब्ध माहितीनुसार मानसिकस्थिती ठिक नसलेल्या मुलीने आपल्या जन्मदात्या बापाला लाकडी फळीने मारहाण केली. त्यातच ते जागीच ठार झाले. या प्रकरणी कुंकळळी पोलिसांनी मुलीला अटक केली आहे.
कुंकळळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, मयत वडिलाचे नाव फिदेरीस कार्दोज असून खून करणाऱया मुलीचे नाव मारियानी कार्दोस असे आहे. मारियानी हिची मानसिकस्थिती ठिक नसल्याने तिला वडिल फिदेरीस यांनी औषध घेण्यास सांगितले. त्यामुळे तिने जन्मदात्या वडिलांना लाकडी फळीने मारहाण केली. त्यात ते जबर मार लागून जखमी झाले. त्यातच त्यांना मृत्यू आला. या घटनेची माहिती मिळताच कुंकळळी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सचिन पन्हाळकर व दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चौकशीला प्रारंभ केला.
पोलिसांना शेजाऱयांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे, मारियानी हिची मानसिकस्थिती ठिक नसल्याने तिच्यावर औषधोपचार सुरू होते. मात्र, गेले काही दिवस तिने औषध घेतले नव्हते. त्यामुळे तिची मानसिकस्थिती बिघडली होती. मारियानी हिच्याकडून धोका असल्याने तिची आई पावलीना आपल्या बहिणीकडे गेली होती. शनिवारी मारियानीने तिला औषधे घेण्यास सांगणाऱया आपल्या वृद्ध आईला मारहाण केली होती. त्यामुळे आई जवळच राहणाऱया बहिणीकडे गेली होती. मात्र, वडिल घरातच होते.
वडिलाचा खून केल्यानंतर मारियानी ही जवळच असलेल्या नदी जवळ जाऊन बसली होती. हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात येताच, त्यांनी तिला तेथून ताब्यात घेतले व पोलिसांकडे सुपूर्द केले. नंतर पोलिसांनी तिला अधिकृतरित्या अटक केली. वडिलाचा खून करणाऱया मुलीचे मेडीकल चेकअप केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.