11 वे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
बेळगाव : घरात शिवीगाळ करून मारहाण करत असल्यामुळे वडिलांना मुलाने जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, वडिलांनीच आपल्या मुलाला संपविले होते. याप्रकरणी न्यायालयाने बापाला दोषी ठरविले होते. त्याला शुक्रवारी न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. येथील 11 वे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. रमाकांत चव्हाण यांनी ही शिक्षा सुनावली. शिवाप्पा गंगाप्पा मुदकवी (वय 58) रा. सालापूर, ता. रामदुर्ग असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिवाप्पाला दोन मुलगे होते. याचबरोबर सुना, नातवंडे होती. शिवाप्पा मद्यावस्थेत घरात आल्यानंतर वारंवार शिवीगाळ करणे, धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकार करत होता. बऱ्याचवेळा त्याला समजावून सांगण्यात आले होते. शिवाप्पा 26 मार्च 2018 रोजी मद्य पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सततच्या शिवीगाळ आणि भांडणांना कंटाळून मयत मुलगा गंगाधर (वय 22) याने ‘तुम्ही आम्हा सर्वांना वारंवार शिवी देत आहात. आम्ही कंटाळलो आहे. तुम्हाला संपवू’ अशी धमकी दिली. त्याचदिवशी रात्री दीडपर्यंत भांडण झाले. त्यामुळे घरात स्वयंपाकदेखील करण्यात आला नाही.
लहान मुले असल्यामुळे गंगाधर हा जेवण आणण्यासाठी रामदुर्ग शहरात गेला होता. तो जेवण घेऊन येत असताना आरोपी शिवाप्पाने ट्रॅक्टर घेऊन त्याच्या मागावर गेला. त्याने गंगाधरच्या दुचाकीवरच ट्रॅक्टर चढविला. त्यामध्ये गंगाधर हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. य् ाा घटनेनंतर आरोपी शिवाप्पाची पत्नी शांतव्वा हिने कटकोळ पोलीस स्थानकामध्ये शिवाप्पाविरोधात फिर्याद दिली. कटकोळ पोलिसांनी शिवाप्पावर भा.दं.वि 302 आणि 304 अन्वये गुन्हा दाखल केला. येथील 11 वे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्यात आले. त्याठिकाणी साक्षी आणि कागदपत्रे तपासण्यात आली. त्यामध्ये शिवाप्पा दोषी आढळला. त्यामुळे न्यायालयाने शिवाप्पाला वरील शिक्षा सुनावली आहे. फिर्यादीच्यावतीने सरकारी वकील म्हणून अॅड. शैलजा पाटील यांनी काम पाहिले आहे.