वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसीच्या आगामी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पीसीबीने रविवारी 15 सदस्यांचा पाक महिला संघ जाहीर केला असून वेगवान गोलंदाज फातीमा सनाकडे कर्णधारपद सोपविले आहे.
2024 च्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पीसीबीने निदा दारच्या जागी 22 वर्षीय फातीमा सनाकडे नेतृत्व देण्याचा निर्णय एकमताने घेतला. फातीमा सना ही पाक संघातील अष्टपैलू म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत टी-20 प्रकारात 31 गडी बाद केले असून फलंदाजीत तिने 215 धावा जमविल्या आहेत. 2023 च्या डिसेंबरमध्ये ख्राईस्ट चर्च येथे झालेल्या महिलांच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळविलेल्या पाक संघाचे नेतृत्व फातीमा सनाकडे होते. या संघामध्ये फलंदाज सदाफ शमासचे पुनरागमन झाले आहे. आगामी होणाऱ्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक महिला संघाचा अ गटात समावेश करण्यात आला असून या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचाही सहभाग आहे.
पाक महिला संघ : फातीमा सना (कर्णधार), आलिया रियाज, डायना बेग, गुल फिरोजा, मुनिबा अली, नेशरा संधू, निदा दार, ओमिमा सोहेल, सदाफ शमास, सादिया इकबाल, शिद्रा अमिन, सइदा अरुब शहा, तस्मिया रुबाब आणि तुबा हसन.