क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
कोचीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर आज रविवारी एफसी गोवाची लढत केरळ ब्लास्टर्स संघाशी होईल. आपल्या मागील लढतीत केरळ ब्लास्टर्सने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरूद्ध पहिली क्लीन शीट राखली.
केरळ ब्लास्टर्सने यंदाच्या हंगामात पाच सामन्यांतून दोन विजय नेंदविले आहेत. त्यांचे मुख्य प्रशिक्षक इव्हान व्हुकोमानोव्हिच हे एफसी गोवाविरूद्ध सुरूवातीच्या अकरा खेळाडूंमध्ये कोणताच बदल करण्याच्या तयारीत नाहीत. मागील सामन्यात माझ्या खेळाडूंनी चांगला खेळ केला. एफसी गोवा संघ हा लीगमधील सर्वोत्तम संघापैकी एक आहे. या संघाला चेंडूवर ताबा ठेवायला आवडते. शारीरिकदृष्टय़ा ते बलवान आहेत आणि हा एक अतिशय कठीण सामना असेल, असे व्हुकोमानोव्हिच म्हणाले.
एफसी गोवाने यंदाच्या हंगामात चार सामन्यांत फक्त एक पराभव स्वीकारला आहे. एफसी गोवाची बचावफळी भक्कम आहे आणि त्यांच्यावर फक्त दोनच गोल प्रतिस्पर्धी संघांकडून झाले आहेत. केरळ ब्लास्टर्सविरूद्धचा विजय त्यांना 12 गुणांसह अव्वल स्थानाच्या शर्यतीत आणून बसवेल. सध्या गतविजेता हैदराबाद एफसीचा संघ 16 गुणांनी अग्रस्थानावर आहे.
एफसी गोवाने मागील सामन्यात आयएसएल 2021-11 मधील शील्ड विजेता जमशेदपूर एफसीविरूद्ध तीन गोल केले. जमशेदपूर एफसीविरूद्धच्या मी खूपच आनंदी आहे. पण आम्हाला अजुनही खेळात सुधारणा अपेक्षित असल्याचे एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्लोस पेना म्हणाले. आता आम्ही नव्या सामन्यासाठी मैदानावर उतरणार आहोत आणि नव्या वातावरणात तुल्यबळ संघाचा आम्हाला सामना करायचा आहे. आम्ही केरळ ब्लास्टर्सविरूद्ध तीन गुण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे पेना म्हणाले.