प्रतिनिधी /काणकोण
आगोंद पंचायतीने आगोंद किनाऱयावर ज्या ठिकाणी हंगामी शॅक्स उभारण्यासाठी परवाने दिलेले आहेत त्याच जागा वन खात्याने कमर्शियल झोन म्हणून जाहीर केल्यामुळे ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनावर संकट ओढवले आहे. काणकोण तालुक्यातील गालजीबाग आणि आगोंद समुद्रकिनाऱयांवरील काही जागा कासव संवर्धन आणि संरक्षणासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत.
मागच्या मोसमात आगोंद किनाऱयावर साधारणपणे 30 सागरी कासवांचे अंडी घालण्यासाठी आगमन झाले होते आणि त्यातील 28 कासवांनी 2762 इतकी अंडी घातली होती, तर गालजीबाग किनाऱयावर 11 कासवांनी 1162 इतकी अंडी घातली होती. या तालुक्यातील आगोंद किनारा कासवांसाठी अधिक सुरक्षित असल्याची माहिती अभयारण्य विभागाकडून देण्यात आली आहे. सागरी कासवांच्या आगमनावर लक्ष ठेवण्यासाठी अभयारण्य विभागाने प्रशिक्षित कामगारांची नियुक्ती केलेली आहे. अशा परिस्थितीत आगोंद किनाऱयावरील जागा कमर्शियल झोन म्हणून जाहीर झाल्यानंतर कासव संवर्धनावर संकट ओढवण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.