वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या आशियाई खंडीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताची 16 वर्षीय महिला ग्रँडमास्टर लिऑन मेंडोकाने तिसऱया फेरीअखेर खुल्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळवले आहे.
गोव्याची मेंडोकाने तिसऱया फेरीतील लढतीत मंगोलियाच्या बेचुलूनचा 49 व्या चालीत पराभव करून पूर्ण गुण वसूल केले. मेंडोकाने खुल्या गटात तीन गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे. तर महिलांच्या विभागात 10 खेळाडूंनी पहिल्या स्थानावर संयुक्त आघाडी घेतली आहे. भारताच्या टॉप सिडेड आर प्रग्यानंदासह 10 बुद्धिबळपटूंनी दुसऱया स्थानावर प्रत्येकी समान 2.5 गुणासह संयुक्त आघाडी घेतली आहे. ग्रँडमास्टर प्रग्यानंदने दुसऱया फेरीतील लढतीत इंटरनॅशनल मास्टर्स एम. प्रणेशचा 40 व्या चालीत पराभव केला. ग्रँडमास्टर कार्तिकियेन मुरली आणि कौस्तुब चटर्जी यांच्यातील लढत बरोबरीत राहिली. कार्तिकेयन मुरली, कौस्तुब चटर्जी, एस. एल. नारायणन, संदीपन चंदा, बी. अधीबन, प्रणव आनंद, शामसुंदर, हर्षा भरतकोटी, तसेच तुर्कीचा अटाबायेव्ह आणि कजाकस्तानचा जुमाबायेव्ह यांनी प्रत्येकी 2.5 गुण नोंदवले आहेत. महिलांच्या विभागात तिसऱया फेरीत अखेर 10 बुद्धिबळपटूंनी प्रत्येकी 2.5 गुणासह संयुक्त आघाडीचे स्थान मिळवले आहे. यामध्ये भारताच्या टॉप सिडेड तानिया सचदेव, रक्षिता रवी, सौम्या स्वामीनाथन, वंटीका अगरवाल, प्रियांका नुटाकी, पी. व्ही. नंदिता यांचा समावेश आहे. तानिया सचदेवने तिसऱया फेरीतील सामन्यात मनीषा मोहांतीवर 37 व्या चालीत मात केली. वंटीका अगरवालने इशा शर्माचा पराभव केला.