गोवावेस सर्कल येथील भारतीय आयुर्विमा मंडळ कार्यालयाच्या आवारातील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
इमारतीच्या पार्किंगमधून गाडी बाहेर काढत असताना चालकाचे नियंत्रण सुटून कारची धडक बसल्याने महिला सफाई कर्मचारी जागीच ठार झाली. शुक्रवारी सकाळी गोवावेस सर्कल येथील भारतीय आयुर्विमा मंडळ कार्यालयाच्या आवारात हा अपघात झाला. अनिता राजेश बनसे (वय 51) असे त्या दुर्देवी महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या खाली असलेल्या बेसमेंट मधील पार्किंग मधून एक व्यक्ती कार बाहेर काढत होता. यावेळी ताबा सुटल्याने कारची धडक थेट इमारतीसमोरील कंपाउंड वॉल आणि सफाई काम करणार्या महिलेला बसली. ही जोरदार धडक बसताच सफाई कर्मचारी असलेल्या त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत कारच्या समोरील डॅशबोर्ड तुटून कारचेही नुकसान झाले.
अपघातानंतर सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. एकंदरीतच कार अपघातात सफाई काम करणार्या महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती.या घटनेची नोंद वाहतूक दक्षिण विभाग पोलिसात झाली असून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.