टिचमनचीही आगेकूच, अझारेंका, कॅनेपी, केर्बरचे आव्हान संपुष्टात
वृत्तसंस्था/ पॅरिस
येथे सुरू असलेल्या प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत कॅनडाची टिनेजर लेलॅह फर्नांडेज तसेच स्वीसची जिल टिचमन, अमेरिकेची कोको गॉफ, अमेरिकेची स्टीफन्स यांनी महिला एकेरीची चौथी फेरीत गाठली. ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड बेनसिक, बेलारूसची अझारेंका, इस्टोनियाची कॅनेपी, जर्मनी अँजेलिक केर्बर यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
येथील रोलँड गॅरोच्या रेड क्ले कोर्टवर सुरू असलेल्या या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात कॅनडाच्या फर्नांडेझने ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा बेनसिकचा 7-5, 3-6, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.
17 व्या मानांकित फर्नांडेझला विजयासाठी तब्बल जवळपास तीन तास झगडावे लागले. या स्पर्धेत कॅनडाच्या फर्नांडेझने पहिल्यांदा महिला एकेरीची चौथी फेरी गाठली. चौथ्या फेरीत फर्नांडेझची गाठ 27 व्या मानांकित अमंदा ऍनिसिमोव्हाशी पडेल.
तिसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात ऍनिसिमोव्हाने कॅरोलिना मुचोव्हाचा 6-7 (7-5), 6-2, 3-0 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. झेकच्या मुचोव्हाला हा सामना चालू असताना दुसऱया फेरीमध्ये घोटय़ाला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर डॉक्टरांनी कोर्टवर तिच्यावर उपचार केले. पण, तिला अधिक वेदना जाणवू लागल्याने तिने या सामन्यातून माघार घेतली. मुचोव्हाला दुसऱया सेटमध्ये सलग सात गेम्स गमवावे लागले.
तिसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात स्वीसच्या 23 व्या मानांकित टिचमनने या स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम राखताना बेलारूसच्या अनुभवी आणि माजी टॉप सीडेड व्हिक्टोरिया अझारेंकाचा 4-6, 7-5, 7-6 (7-5) असा पराभव करत चौथी फेरी गाठली. टिचमनचा चौथ्या फेरीतील सामना अमेरिकेच्या स्लोनी स्टिफन्सविरुद्ध होणार आहे. स्टिफन्सने तिसऱया फेरीतील सामन्यात डायना पेरीचा 6-2, 6-3 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले.
अमेरिकेच्या कोको गॉफने इस्टोनियाच्या कॅनेपीचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. गॉफचा चौथ्या फेरीतील सामना बेल्जियमच्या मर्टन्सविरुद्ध होणार आहे.
तिसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात सेसनोव्हिचने जर्मनीच्या माजी टॉप सीडेड अँजेलिक केर्बरचे आव्हान 6-4, 7-6 (7-5) असे संपुष्टात आणत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. बेलारूसचा सेसनोव्हिचचा चौथ्या फेरीतील सामना इटलीच्या ट्रेव्हीसेनविरुद्ध होणार आहे.