ब्लॅकमेल करून उकळले पैसे : अज्ञात संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरीमधील तरूणाला व्हिडीओ कॉल वर नग्न होण्यास भाग पाडून त्याच्याकडून 50 हजार 500 रूपये उकळल्याची (सेक्सटॉर्शन) घटना समोर आली आह़े ही घटना गुरूवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरूणाने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत अज्ञात महिला व पुरूषाविरूद्ध तकार दाखल केली. त्यानुसार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिकडच्या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉटसॲप या समाज माध्यमांचा वापर करून सेक्सटॉर्शन केले जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरूणाची संबंधीत महिलेशी समाजमाध्यमावर ओळख झाली होती. यावेळी या महिलेकडून तक्रारदार तरूणाला मेसेज करण्यात आले होते. त्याचप्रमाणे वेळोवेळी या महिलेने व्हिडीओ कॉल करून त्याचा विश्वास संपादीत करत मैत्री केली. 24 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 च्या सुमारास संबंधित महिलेने या तरूणाला व्हिडीओ कॉल केला. यावेळी स्वतः नग्न होत या महिलेने व्हिडीओ कॉलवर तरूणाला नग्न होण्यास सांगितले. भावनेच्या भरात या तरूणाने देखील व्हिडीओ कॉलवर स्वतचे कपडे उतरवले. दरम्यान तरूणाचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ चित्रण संबंधित महिलेकडून करण्यात आले. तसेच काही वेळातच कॉल कट करण्यात आला.
दरम्यान, काही वेळातच तक्रारदार तरूणाला संशयित आरोपी पुरूषाने फेन करून पैशाची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीस तर तुझा नग्न व्हिडीओ युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर प्रसारित केला जाईल, अशी धमकी दिली. यावेळी आपली समाजात बदनामी होणार या भीतीने तक्रारदाराने गुगल पेच्या माध्यमातून 50 हजार 500 रूपये संशयितांनी दिलेल्या नंबरवर पाठवून दिले. दरम्यान आपली फसवणूक झाली असल्याचे या तरूणाच्या लक्षात आल्यानंतर यासंबधी या तरूणाने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिला व पुरूषाविरूद्ध भादवि कलम 420, 34 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.