Video Viral : काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेनं येत असलेल्या विमानात एका प्रवाशानं महिलेच्या तोंडावर मूत्रविसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.दरम्यान दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या विमानात मद्यधुंद प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता बांगलादेश एअरलाईन्सच्या विमानातही हाणामारीची घटना समोर आल्यामुळं विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांमधील विमानात हाणामारीच्या घटना समोर आलेल्या आहे. त्यातच आता बांगलादेशातही उडत्या विमानात मारामारी झाल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं जगभरात खळबळ उडाली आहे.
ढाक्यासाठी निघालेलं बांगलादेश एअरलाइन्सच्या बोईंग ७७७ या विमानात काही प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. परंतु प्रवाशांनी एकमेकांना शिवीगाळ केल्यामुळं प्रकरण चिघळलं. त्यानंतर संतापलेल्या एका तरुणानं दुसऱ्या प्रवाशाचे कपडे फाडून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या गटाच्या प्रवाशांनीही तरुणावर हल्ला केला. विमानामध्ये अचानक हाणामारी सुरू झाल्यानं इतर प्रवाशांनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी प्रवासी कर्मचाऱ्यांसहीत कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झाल्यामुळं विमानातील कर्मचाऱ्यांनाही भांडणं सोडवता आले नाही. त्यानंतर विमान ढाका विमानतळावर उतरल्यानंतर विमानतळ पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे.


previous post