वृत्तसंस्था/ माद्रीद (स्पेन)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद मास्टर्स 1000 दर्जांच्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अलकॅरेझ आणि जर्मनीचा ऍलेक्सझांडेर व्हेरेव्ह यांच्यात पुरूष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. तसेच एकाच क्लेकोर्टवरील टेनिस स्पर्धेत नदाल आणि जोकोव्हिच या अव्वल खेळाडूंना पराभूत करणारा स्पेनचा अलकॅरेझ हा पहिला टेनिसपटू आहे.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या एकेरीच्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या कार्लोस अलकॅरेझने सर्बियाच्या माजी टॉप सीडेड जोकोव्हिचचा 6-7 (5-7), 7-5, 7-6 (7-5) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना जिंकण्यासाठी अलकॅरेझला तब्बल साडेतीन तास झगडावे लागले. दुसऱया उपांत्य सामन्यात जर्मनीच्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हने ग्रीसच्या स्टिफँनोस सिटसिपेसचा 6-4, 3-6, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. व्हेरेव्ह आणि सिटसिपेस यांच्यात आतापर्यंत 11 सामने झाले असून व्हेरेव्हने 4 तर सिटसिपेसने 5 सामने जिंकले आहेत.